नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच अनेक सामाजिक संस्था, संघटना व उद्योजकांचा पुढाकार
गणेश मूर्ती हौदात विसर्जित करण्याचे आवाहन
पिंपरी : भारतीय सण, उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करीत असताना वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरणपूरक साधनांचा वापर करावा. देशभर सुरु असणा-या गणेशोत्सव काळात नदी नाल्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी अनेक सामाजिक संस्था, संघटना व उत्साही कार्यकर्ते उपक्रम राबवित असतात. मांगल्याचे प्रतिक असणारा गणेशोत्सव यावर्षी देखील पिंपरी – चिंचवड शहरात मोठ्या भक्ती भावाने, उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. शहराच्या जीवनवाहिन्या असणाऱ्या पवित्र इंद्रायणी आणि पवना नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच अनेक सामाजिक संस्था, संघटना व उद्योजक पुढाकार घेऊन काम करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून आसवाणी असोशिएटस् आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेतर्फे पिंपरी गावातील वैभवनगर येथे सार्वजनिक मंडळांच्या व घरगुती गणेशमृर्ती विसर्जनासाठी लहान, मोठ्या आकाराचे एकूण तीन हौद उभारण्यात आले आहेत. येथे गणेश मूर्ती विसर्जित कराव्यात, असे आवाहन संयोजक विजय आसवानी यांनी केले आहे.
10 ते 18 फूट खोलीचे तीन हौद
पिंपरी गावातील वैभवनगर येथे विजय आसवाणी यांच्या संकल्पनेतून सलग दुस-या वर्षी खासगी जागेत गणेशमूर्ती विसर्जनासाठी लहान, मोठ्या आकाराचे एकूण तीन हौद उभारण्यात आले आहेत. याचे उद्घाटन शुक्रवारी माजी नगरसेविका व जयहिंद हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका ज्योतिका मलकानी यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक राजू आसवानी, श्रीचंद आसवानी, सतीश आसवानी, अनिल आसवानी आदी उपस्थित होते. आसवाणी यांनी या उपक्रमाविषयी सांगितले की, वैभवनगर येथे एकूण 10 ते 18 फूट खोलीचे तीन हौद उभारण्यात आले आहेत. मूर्तीबरोबर असणारे निर्माल्य व सजावटीचे साहित्य वेगळे ठेवण्यासाठी स्वयंसेवक व पिंपरी चिंचवड रोट्रॅक्ट क्लबचे ज्येष्ठ नागरिक भाविकांचे प्रबोधन करणार आहेत. याठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करावे यासाठी स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तपणे पिंपरी-चिंचवड, काळेवाडी, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, तानाजीनगर, लिंकरोड परिसरात घरोघरी जाऊन, सोसायट्यांमधील मंडळांच्या पदाधिका-यांना भेटून आवाहन व प्रबोधन करीत आहेत. पत्रके वाटून व सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील जनजागृती केली जात आहे. त्यामुळे मंगळवारी सुमारे 500 हून जास्त दिड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन या हौदांमध्ये करण्यात आले.
खासगी अनुभवी जीवरक्षकांची नेमणुक…
भाविकांसाठी विसर्जनाच्या वेळी श्रींच्या आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या वतीने पाणी व निर्माल्यकुंड दिले आहे. संयोजकांच्या वतीने विद्युत व्यवस्था व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच खासगी अनुभवी जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. जीवरक्षक विधीवत पध्दतीने या हौदांमध्ये मृर्ती विसर्जन करतील. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून या वर्षी 15000 मूर्ती विसर्जित केल्या जातील असा अंदाज संयोजक विजय आसवानी यांनी व्यक्त केला. मागील वर्षी या ठिकाणी छोट्या मोठ्या मिळून 9842 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यावेळी जमा झालेल्या मूर्तींचे विघटन करण्यात आले. त्यातून जमा झालेल्या मातीतून आकर्षक कुंड्या बनवण्यात आल्या आहेत. त्या कुंड्यांचे यावर्षी भाविकांना व गणेश मंडळांना संयोजकांच्या वतीने मोफत वाटप करण्यात येणार आहे, अशीही माहिती उद्योजक श्रीचंद आसवानी यांनी दिली आहे.