वसुलीसाठी शिबिराचा आधार

0

वरणगाव । गेल्या अनेक महिन्यांपासून नगपालिकेची नागरिकांकडे पाणीपट्टी व घरपट्टी थकीत कर असल्याने पालिकेंतर्गत वसुलीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र वसूलीचे उद्दीष्ट पूर्ण होत नसल्याने पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या आदेशाने गुढीपाडव्याच्या मूहर्तावर बसस्थानक चौकात तंबू उभारून एकदिवसीय शिबीरातून थकीत कर वसूली अभियान राबविण्यात आले.

तत्कालीन ग्रामपंचायतीपासून कर वसूली नागरीकांकडे थकबाकी होती. मात्र ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रुपांतर झाले असतांना देखील थकबाकीत वाढ झाली आहे. ही थकबाकी शासनाच्या आदेशानुसार मार्च अखेर वसूली पूर्ण व्हावी. या दृष्टीकोनातून पालिकेच्या माध्यमातून पथनाट्य, थकबाकीदारांचे जाहिरात फलक, स्थानिक दुर्दशन जाहिराती, अशा विविध उपययोजना पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जात आहे. मंगळवार 28 रोजी बसस्थानक चौकात तंबू उभारून एक दिवसीय या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सुविधांकडे लक्ष देण्याची गरज
पालिकेची दैनंदिन वसुली 70 ते 80 हजार पर्यंत असून शासनाच्या नियमानुसार शहरात वसुली अभियान राबविण्यात येत आहे. मात्र पालिकेतर्फे अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्यात येत नाही, त्यामुळे काही नागरिक थकीत कर वसुली देण्यासंदर्भात नाराज असल्याचे दिसून येते. याचा परिणाम कर्मचार्‍यांना वसुली करताना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मुख्य रस्त्यावरील भोगावती नदीपात्रापासून तर रेल्वे स्टेशन पर्यंत व इतर प्रभागातील काही पथदिवे बंद अवस्थेत आहे. तर नगरात पुरेसे सार्वजनिक शौचालयाचा अभाव असल्याने महीला व पुरुषांची कुचंबणा होत आहे. तरी सक्तीच्या वसुली बरोबर नागरि सुविधांकडे पालिका मुख्याधिकार्‍यांनी व नगरसेवकांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिक करीत आहे.

कर्मचार्‍यांसमोर वसुलीचे आव्हान
शहरात विकास कामे करण्यासाठी पालिकेतर्फे कराची आकारणी करण्यात येत असते. यातूनच पालिका प्रशासन हे नागरिकांना विविध सोयी – सुविधा पुरवित असते. मात्र ग्रामपंचायतीपासून ते आता नगरपालिकेत रुपांतर होईपर्यंत मोठ्या प्रमाणात कर थकबाकी असल्याचे पालिकेसमोर वसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे.

पथकात यांचा आहे समावेश
शिबिराला वसुली सदर्भात नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून शिबिराच्या यशस्वीतेसाठी पालिकेचे ओएस गंभीर कोळी, सुरेश शेळके, गणेश कोळी, रविंद्र नारखेळे, संजय माळी, अनिल चौधरी, प्रमोद बावणे, रविंद्र धनगर, सुनिल तायडे, प्रशांत माळी, रामदास भोई, अशोक चौधरी, सोपान भोळे, विजय मराठे, योगेश धनगर, संगीता भैसे, सुरेखा मराठे आदी कर्मचारी परिश्रम घेत आहे. या कर्मचार्‍यांनी नागरिकांना वसुलीबाबत माहिती देऊन लवकरात लवकर भरणा करण्याचे आवाहन केले.