वसूली मोहिमेत अडथळा आणल्यास होणार कारवाई

0

महावितरणने दिला कर्मचार्‍यांनाच अल्टीमेटम

भुसावळ :- महावितरणने थकबाकी वसूलीदरम्यान अडथळा आणणार्‍या कर्मचार्‍यांबाबत गंभीर दखल घेतली असून अडथळे आणण्याबाबतचे प्रकार समोर आल्यास अशा कर्मचार्‍यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश महावितरणच्या परिमंडळ मुख्य अभियंत्यांनी दिले आहेत. यामुळे महावितरणच्या कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

महावितरण कंपनीने राज्यभरात धडक वसूली मोहिम सुरु केली आहे. याच माध्यमातून शहरासह विभागातील पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायतीचे पथदिवे लाइटबिल थकीत असल्याने वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यासह घरगुती वापराच्या थकीत वीजग्राहकांवरही थेट वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली जात आहे. यासाठी महावितरण कंपनीने स्वतंत्र वसूली पथकाची नेमणूक केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या वसूली व कारवाईसाठी नेमलेल्या पथकाला महावितरणचे कर्मचारीच दिशाभुल करीत आहे. नातेवाईक, परिचित व आप्तमंडळींवर कारवाई करु नये, म्हणून पथकातील कर्मचार्‍यांना चूकीची माहिती देणे, दिशाभुल करणे, धमकाविणे आदी प्रकार समोर येत आहे. यामुळे महावितरण कंपनीने आता वसूलीच्या प्रक्रियेत बाधा आणणार्‍या तसेच वसूली पथकातील कर्मचार्‍यांना नाहक दबाव टाकणार्‍या महावितरण कर्मचार्‍यांवरही लक्ष वेधले आहे. याबाबत वसूली पथकातील प्रमुखांनी कर्मचार्‍यांची माहिती दिल्यास कंपनी द्रोहाचा प्रकार करणार्‍या कर्मचार्‍यांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. वसूली पथकातील कर्मचार्‍यांनी याबाबत मॅसेजव्दारे माहिती दिल्यास कारवाई करण्यात येणार आहे यामुळे आता वसूली पथकांच्या कामात लूडबूड करणे किंवा अडथळा निर्माण करणार्‍या महावितरणच्या कर्मचार्‍यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.