वस्तुस्थिती समोर मांडा, सचिन, गांगुली, लक्ष्मणचे बीसीसीआयला पत्र

0

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघासाठी रवी शास्त्री यांच्यासोबत झहीर खान आणि राहुल द्रविड यांची गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी प्रशिक्षक आणि सल्लागारपदावर नियुक्ती केल्यावर प्रशासकीय समितीने उपस्थित केलेल्या प्रश्‍नांबाबत सचिन, गांगुली आणि लक्ष्मणचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने पत्र लिहून बीसीसीआयला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

रवी शास्त्री यांची निवड करण्याबरोबर क्रिकेट सल्लागार समितीने एक पाऊल पुढे जात झहीर आणि द्रविडची नियुक्ती केल्याचा आरोप प्रशासकीय समितीने केला होता. प्रशासकीय समितीने उपस्थित केलेल्या प्रश्‍नामुळे क्रिकेट सल्लागार समितीच्या भूमिकेबाबत प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे. मात्र झहीर आणि द्रविडची नियुक्ती शास्त्री यांच्याशी चर्चा केल्यानंतरच केली असल्याचे क्रिकेट सल्लागार समितीने प्रशासकिय समितीचे प्रमुख विनोद राय यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.

संदीप पाटील आणि इरपली प्रसन्नाची समितीवर आगपाखड
दरम्यान माजी प्रशिक्षक संदीप पाटील आणि दिग्गज फिरकी गोलंदाज इरपली प्रसन्ना यांनी क्रिकेट सल्लागार समितीवर आगपाखड केली आहे. संदीप पाटील म्हणाले की, सचिन,गांगुली, लक्श्मण महान खेळाडू या दुमत नाही. पण त्यांनी याआधी कधी प्रशिक्षक म्हणून काम केलेले नाही. मग कुठल्या आधारावर ते प्रशिक्षकाची निवड करतात. इरपली प्रसन्ना यांनी निवड प्रकिया हे केवळ नाटक होते असा आरोप केला आहे. शास्त्रींची निवड आधीच झालेली होती तर या त्रिमुर्तीने सरळ शास्त्रींचे नाव जाहीर करायचे होते. त्यासाठी दोन दिवस नाटकबाजी का केली असा सवाल प्रसन्ना यांनी विचारला.