धुळे । वस्तू व सेवा कर कायदा अर्थात जीएसटी हा साधा व सोपा कायदा आहे. हा कायदा ग्राहक, व्यापारी आणि देशाच्या हिताचाच आहे. या कायद्यामुळे पारदर्शकता वाढून देशाचा महसूल वाढणार आहे. त्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे केले. भारत सरकारच्या वस्तू व सेवा कर कायद्याच्या धुळे विभागातर्फे आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नवीन नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी व्यापारी संघटना व व्यापार्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, वस्तू व सेवा कर आयुक्त आर. पी. शर्मा, सहआयुक्त पी. के. राऊत उपस्थित होते.केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले, वस्तू व सेवा कर कायदा देशाचे भविष्य बदलणारा कायदा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. यामुळे सामान्य माणसाला बळ मिळणार आहे. या कायद्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होणार आहे.तसेच या कायद्यामुळे महसूल वाढ होणार आहे.
कायद्याविषयी घाबरण्याचे नाही कारण
या कायद्याशी निगडित सर्वांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी आपण आलो आहेत. तुमच्या अडचणी, समस्या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, महसूल सचिव, जीएसटी कौन्सिलकडे मांडण्यात येतील. त्यामुळे या कायद्याविषयी घाबरण्याचे कोणतेच कारण नाही.अद्ययावत तंत्रज्ञानामुळे जग हे एक खेडे झाले आहे. अद्ययावत संवाद यंत्रणा विकसित झाल्या आहेत. ग्रामीण भागातही स्मार्ट फोनचा वापर वाढला आहे. त्यामुळे प्रतयेकाने डिजिटल होत नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करीत काळाबरोबर चालावे, असेही त्यांनी नमूद केले. प्रास्ताविकपर भाषणात आयुक्त श्री. शर्मा यांनी सांगितले, व्यावसायिक व ग्राहक केंद्रीत हा कायदा आहे. वस्तू व सेवा कर कायद्याच्या रुपाने ही फार मोठी कर सुधारणा आहे. पाचही जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या सोयीसाठी वस्तू व सेवा कर आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच धुळे, नंदुरबार, दोंडाईचा येथे जीएसटी सेवा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.