वहिवाटीचा रस्ता मोजताना पोलिसांवर तुफान दगडफेक : 12 आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निकाल : आरोपींना बसली चपराक

भुसावळ : रावेर तालुक्यातील कर्जोद शिवारातील एका शेती शिवारातील गट नं. 247 ब मधील वहिवाटीचा रस्ता पोलिस बंदोबस्तात मोकळा करत असताना विरोधी गटाने दगडफेक केल्याने रावेरचे उपनिरीक्षक मनोजकुमार वाघमारे यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. शनिवार, 21 ऑगस्ट 2021 रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी एका गटाच्या 17 जणांविरुद्ध रावेर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील 12 संशयीतांनी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्या.जाधव यांनी तो फेटाळून लावला. पोलिसांवर हल्ला करणार्‍या आरोपींना न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठी चपराक बसली आहे.

पोलिसांवर केली होती तुफान दगडफेक
कर्जोद शिवारातील वहिवाटीचा रस्ता मोकळा करून तार कंपाउंड करण्याचे काम शनिवार, 21 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता सुरू होते. त्यावेळी गोकुळ हुकुमचंद चारण, देवा नारायण चारण, हुकूम किसन चारण, पुनाबाई हुकूम चारण, रमाबाई देवा चारण, गोकुळ नारायण चारण, लाभो नारायण चारण, भूराबाई लाभो चारण, परवीन कान्हा चारण, भिकन बुवा चारण, दादू भिकन चारण, नारायण राणा चारण, लीनाबाई गोकुळ चारण, राजेश हरी चारण, चेतन कान्हा चारण, कान्हा नारायण चारण, सोनाबाई कान्हा चारण व इतरांनी मारहाण, दगडफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. दगडफेकीत बंदोबस्तासाठी असलेले उपनिरीक्षक मनोजकुमार वाघमारे, महिला पोलीस माधवी मोरे व पुरुष पोलीस कर्मचारी श्रीराम वानखेडे जखमी झाले. माधवी मोरे यांच्या फिर्यादीवरून वरील 17 संशयीतांसह सहा अज्ञात व्यक्तींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी पाच संशयीतांना अटक करण्यात आली होती मात्र नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

12 संशयीतांचा एकाचवेळी जामीन फेटाळला
दगडफेक प्रकरणातील संशयीत गोकुळ नारायण चारण, नारायण राणा चारण, लाभो नारायण चारण, भुराबाई लाभो चारण, परवीन कान्हा चारण, भिकन बुवा चारण, दादू भिकन चारण, लीनाबाई गोकुळ चारण, राजेश हरी चारण, चेतन कान्हा चारण, कान्हा नारायण चारण, सोनाबाई कान्हा चारण यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव यांच्या कोर्टात जामीन अर्ज क्रमांक 544/2021 दाखल केला होता. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायालयाने 12 आरोपींचा जामीन फेटाळला. या निर्णयामुळे पोलिसांवर हल्ला करणार्‍यांवर व शासकीय कामात अडथळा आणणार्‍यांवर वचक निर्माण झाला आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.एम.डी. देशपांडे यांनी तर मूळ फिर्यादी सुनील महाजन यांच्यातर्फे अ‍ॅड.भगवान जी. पाटील (जळगाव) यांनी प्रभावी युक्तीवाद केला.