भुसावळ- मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या नीलगायीच्या पारड्याला वाचवून वांजोळकरांनी भूतदया जोपासल्याने त्यांचे समाजमनातून कौतुक होत आहे. पोलिस आणि वनविभागाला कळवून या चिमुरड्या पारड्यास औषधोपचार करून जंगलात सोडून देण्यात आले. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली.
वांजोळकरांच्या सतर्कमुळे वाचले पारडूचे प्राण
वांजोळा येथील नथाबाई सावळे यांच्या मालकीच्या शेतात किशोर सावळे तर बाजूच्या शेतात दुर्गेश जाधव व मजूर काम करीत असताना मोकाट कुत्र्यांनी एका निलगायीच्या पारड्यावर हल्ला चढवला. झुडूपात सुरू असलेला हा प्रकार किशोर व दुर्गेश यांच्या लक्षात आल्याने त्यांच्यासह मजूर अरुणा सावळे, शोभा पाटील, देवराम सावळे आदींनी धाव घेत कुत्र्यांच्या तोंडातून नीलगायीच्या पिलास काढून त्याचा जीव वाचवला. प्रथमदर्शनी हे हरणाचे पिलू असल्याचा अंदाज असल्याने तालुका पोलिस व वनविभागाला माहिती देण्यात आली. वांजोळ्याचे सरपंच नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक सुरेश वैद्य, वनविभागाचे कुर्हे येथील वनपाल बी.एन.पवार, वनरक्षक एस.आर.चिंचोले, वनसेवक भास्कर पाटील, अभिमन्यू कोळी, शाम भिल आदींनी भेट देवून पाहणी केली. जखमी श्वापद हे हरीण नसून निलगाईचे पिलू असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक उपचार करुन या पिलास जंगलात सोडण्यात आले.