जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारेंनी केला भंडाफोड : पोषण आहारातील भ्रष्टाचाराने गाठला कळस
भुसावळ (गणेश वाघ)- जिल्हा परीषदेतील निकृष्ट पोषण आहारासह बुरशीयुक्त शेवयांचे प्रकरण गाजत असताना तालुक्यातील वांजोळा येथील अंगणवाडीतील चिमुकल्यांना पुरवण्यात येणार्या पोषण आहारात चक्क गोमसह अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा परीषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी शुक्रवारी सकाळी अचानक वांजोळ्यातील अंगणवाड्यांना भेट देत पोषण आहाराची तपासणी केल्यानंतर ही गंभीर बाब उघडकीस आली. चिमुकल्यांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या या प्रकारातील दोषींवर आतादेखील कारवाई होणार की नेहमीसारखी त्यांची आताही पाठराखण होणार? असा संतप्त सवाल पालकवर्गातून उपस्थित होत आहे.
तपासणीत आढळल्या गोम व अळ्या
जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांना निकृष्ट पोषण आहारासंदर्भात तक्रारी आल्यानंतर त्यांनी शुक्रवारी अचानक वांजोळ्यातील दोघा अंगणवाड्यांना भेट दिली. आज बालकांना पॅकेटमध्ये उपमा पुरवण्यात आला होता तर उपमाचे पॅकेट फोडल्यानंतर त्यात चक्क गोम व अळ्याच बाहेर पडल्याने उपस्थितही अवाक झाले. विशेष म्हणजे एका अंगणवाडीत केवळ पाच बालके होती तर दुसरीमध्ये एकही बालक आले नसल्याने अप्रिय घटना टळली. या प्रकारानंतर शालेय पोषण आहार अधीक्षकांसह जिल्हा स्तरावरील अधिकार्यांना याबाबत माहिती कळवण्यात आली असून काही वेळात अधिकारी दाखल होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, दोषी पुरवठादारांवर प्रशासन आता कारवाई करणार की पुन्हा पाठिशी घालणार ? हा एकच सवाल आता पालकवर्ग उपस्थित करीत आहेत.