दोन ठिकाणी रहिवाशांना जाग आल्याने अनर्थ टळला ; चोरट्यांच्या दगडफेकीत वन कर्मचारी मुलासह आई जखमी
भुसावळ- शहरात मुक्कामी असलेल्या चोरट्यांनी आपला मुक्काम आता ग्रामीण भागाकडे वळवला असून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वांजोळा येथे सिनेस्टाईल आलेल्या चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्याला चाकू लावत पाच हजारांची रोकड लांबवली तर दोन ठिकाणी चोरी करताना रहिवाशांना जाग आल्याने चोरट्यांनी दगडफेक करीत धूम ठोकली. शुक्रवारी रात्री 12 वाजेनंतर झालेल्या या प्रकाराने वांजोळा ग्रामस्थ धास्तावले आहेत. तालुका पोलिसांकडून गस्त होत नसल्याचा आरोप असून माहितगार चोरट्यांचे हे कृत्य असल्याचे बोलले जात आहे. घरफोडीच्या अनुषंगाने जळगाव येथून श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.
चोरट्यांच्या धुमाकुळाने हादरले वांजोळा
भुसावळ शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वांजोळा गावात शुक्रवारी रात्री 12 वाजेनंतर तोंडाला रूमाल बांधून आलेल्या 18 ते 25 वयोगटातील चोरट्यांनी सर्वप्रथम वसंत दादा नगरातील रहिवासी व बर्हाणपूर वन विभागाचे कर्मचारी शुभम रवींद्र ठाकूर यांच्या घराकडे मोर्चा वळवला. चोरट्यांनी घराचा मागील बाजूचा दरवाजा व गेट तोडल्याचा आवाज झाल्याने ठाकूर यांच्या आईला जाग आल्याने त्यांनी आपला मुलगा शुभम यास जागे केले. दोघाही माय-लेकांनी चोर-चोर असा आवाज दिल्याने चोरट्यांनी दोघांच्या अंगावर दगड-विटांचा मारा सुरू करीत पळ काढला. शुभम यांच्या डोक्याला दगड लागल्याने ते जागीच कोसळले.
वृद्धेच्या गळ्याला चाकू लावून लुटले
पहिल्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामपंचायत कार्यालय परीसरातील संभाजी गिरधर पाटील यांच्या घराकडे वळवला. उन्हाळ्यामुळे सर्व कुटुंब घराच्या गच्चीवर झोपले होते तर घरात वयोवृद्ध आजी अनुसयाबाई गिरधर पाटील (85) या गाढ झोपेत असताना चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांची चाहूल लागल्याने अनुसयाबाई जागे झाल्या मात्र चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला मोठा धारदार चाकू लावत आवाज काढल्यास गळा चिरून टाकू, अशी धमकी दिल्याने वृद्धा भयभयीत झाल्या. चोरट्यांनी घरातील पेट्या तसेच कपाटातील सामानाची फेकाफेक करीत सुमारे पाच हजारांची रोकड तसेच काही भांडे लांबवले. चोरटे पसार झाल्यानंतर वृद्धेने गच्चीवर झोपलेल्या सदस्यांना जोरा-जोरात आवाज दिल्यानंतर सदस्यांनी घरात धाव घेतली मात्र तो पर्यंत चोरटे पसार झाले होते.
भिल्ल वस्तीत घरफोडीचा प्रयत्न
संभाजी पाटील यांच्या घरात चोरी केल्यानंतर चोरट्यांनी भिल वस्ती, महादेव नगर भागातील अनिल भील यांच्या घराकडे धाव घेतली. चोरटे दरवाजा तोडण्याचा प्रयत्नात असताना आशाबाई अनिल भील यांना जाग आल्याने त्यांनी पती अनिल यांना उठवले तर दाम्पत्याने आरडा-ओरड करताच चोरट्यांनी धूम ठोकल्याने चोरी टळली.
तालुका पोलिसांनी घेतली धाव
शुक्रवारी रात्री 12 वाजेनंतर ते शनिवारी मध्यरात्री एक वाजेदरम्यान सुमारे तासाभरात चोरट्यांनी एका ठिकाणी घरफोडी केली तर दोन ठिकाणी प्रयत्न अयशस्वी ठरला. तासभर चोरट्यांचा धुमाकुळ सुरू असलातरी ग्रामस्थांनी रात्री तालुका पोलिसांना माहिती कळवली नसल्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार म्हणाले. पहाटे याबाबतची माहिती तालुका पोलिसांना कळवल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. या प्रकरणी सचिन संभाजी पाटील यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पाच हजारांची रोकड चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे तर अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याने जवाब नोंदवण्यात आला.
श्वानाने दाखवला माग
शनिवारी दुपारी जळगाव येथून डॉग स्कॉडसह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत चोरट्यांचा माग दाखवला तर तज्ज्ञांनी चोरट्यांचे ठसे टिपण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वांजोळा गावात पोलिसांची गस्त अपवादात्मकरीत्या होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. एकाचवेळी तीन ठिकाणी घरफोडी होण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे मानले जात असून पोलिसांनी गस्त वाढवण्यासह चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, चोरट्यांनी गावातील प्रत्येक गल्ली-बोळाची असलेली माहिती पाहता चोरटे स्थानिक वा माहितगार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.