अनागोंदी उघड ; जि.प.सदस्यांची तक्रार
भुसावळ:- जिल्ह्यात निकृष्ट शालेय पोषण आहाराचे प्रकरण गाजत असतानाच पुन्हा बुधवारी वांजोळा येथे याच प्रकारे भेसळयुक्त व निकृष्ट डाळ शालेय शिक्षण समिती आणि ग्रामस्थांना आढळल्यानंतर त्यांनी या संदर्भात जिल्हा परीषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांच्याकडे तक्रार केली. सदस्यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने पंचनामा करीत डाळ माघारी बोलावली असलीतरी पुन्हा त्यातून गैरप्रकार उघड झाला आहे.
शासनाकडून निकृष्ट डाळ आलीच कशी ?
महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन लिमिटेडतर्फे सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून जिल्ह परीषद शाळांना पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. या माध्यमातून बुधवारी वांजोळा येथील जिल्हा परीषद शाळेला तुरडाळीचा पुरवठा झाला मात्र ही डाळ भेसळयुक्त व निकृष्ट असल्याची बाब मुख्याध्यापिका उषा सोनवणे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा संगीता तायडे व सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच देविदास साळवे यांना माहिती दिली. यानंतर पदाधिकार्यांनी जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांना माहिती दिली. सावकारे यांनी शालेय पोषण आहार अधिक्षक सुमित्र आहिरे यांना ही माहिती देवून स्पॉट व्हिजीट करण्याच्या सूचना दिल्या. यानुसार आहिरे व वांजोळा येथील पदाधिकार्यांनी डाळीची पाहणी केली. या डाळीत भेसळ आढळून आल्याने शालेय शिक्षण समितीने हा पुरवठा पंचनामा करून परत पाठवला आहे. दरम्यान, सदस्य पल्लवी सावकारे म्हणाल्या की, शासन शेतकर्यांकडून उत्कृष्ट डाळीची खरेदी करते तर असे असताना निकृष्ट डाळीचा पुरवठा होणे ही बाब संशयास्पद आहे. कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय रॅकेट असल्यास त्याचा आपण पर्दाफाश करू.
बालकांचे आरोग्य आले धोक्यात
केंद्र शासनाने गेल्या काळात आयात केलेली तुरडाळ शासकीय गोदामात पडून आहे. हा निकृष्ट डाळीचा पुरवठा आता शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांसाठी दिला जात असल्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला. यामुळे बालकांच्या आरोग्याची शासनाला किती चिंता आहे? हे कळून येते.
जिल्हा परीषद सदस्यांची तत्परता
जिल्हा परिषद शाळेत होणार्या नित्कृष्ठ आणि भेसळ तुरडाळ पाहून पदाधिकार्यांनी जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांना संपर्क साधला. यामुळे किमान या नित्कृष्ठ धान्याचा पुरवठा थांबवता आला. यामुळे गावातील विद्यार्थ्यांना दिला जाणार्या नित्कृष्ठ आहार देणे थांबले. तालुक्यातही पुरवठा झालेल्या डाळींची चौकशी होणे गरजेचे आहे.