मुंबई : वांद्रे टर्मिनसला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी केली आहे. खासदार महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं वांद्रे येथे दीर्घकाळ वास्तव्य होतं. त्यामुळे वांद्रे टर्मिनसला त्यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी पूनम महाजन यांनी केली आहे. या मागणीमागे कोणतंही राजकारण नसल्याचा खुलासाही महाजन यांनी केला. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी ही मागणी केल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. महाजन यांनी यापूर्वी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन वांद्रे टर्मिनसला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी केली होती. मात्र त्याबाबत गृहमंत्रालयाची परवानगी घेण्याची सूचना गोयल यांनी महाजन यांना केली होती. त्यानुसार त्यांनी राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून तशी परवानगी मागितली आहे.