मुंबई – मुलीची छेड काढल्याबद्दल जाब विचारला म्हणून एका माथेफिरूने मुलीच्या आईसह तिघांवर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. या आरोपीला आज दुपारी वांद्रे येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दिपक वीरबहादूर जाट असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान आगीत गंभीररित्या भाजलेल्या अमरावती रमेश हरिजन यांची प्रकृती अद्याप गंभीर असून त्या 95 टक्के भाजल्या आहेत. तर कांता इंका आणि त्यांची मुलगी प्रत्येकी 35 टक्के भाजले असून त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमरावती हरिजन या महिला वांद्रे येथील बी. जे. रोडवरील गणेशनगरात त्यांच्या पती आणि मुलांसोबत राहतात. त्यांचे घरात ब्रेसलेट बनवण्याचा व्यवसाय असून तिथेच त्या विक्रीही करतात. काही दिवसांपूर्वी त्यांची मुलगी रोशनी हिची त्याच परिसरात राहणार्या दिपक या तरुणाने छेड काढली होती. हा प्रकार मुलीकडून समजताच तिच्या पालकांनी दिपकची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यानंतर त्यांच्यात सतत भांडणे होत होती. दोन दिवसांपूर्वी दुपारी अमरावती, रोशनी, त्यांची भाडेकरु कांता इंका या त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीसोबत ब्रेसलेट बनवण्याचे काम करत होते. यावेळी तिथे दिपक आला आणि त्याने अमरावती यांना आता तुला जाळून टाकतो बघ असे बोलून त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतले. काही कळण्यापूर्वीच त्याने त्यांना पेटवून दिले. त्यानंतर तो तेथून पळून गेला होता. या प्रकारानंतर रोशनीने इतर स्थानिक रहिवाशांच्या मदतीने अमरावती, कांता आणि त्या लहान मुलीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आगीत गंभीररित्या भाजलेल्या तिघांनाही तातडीने पोलिसांनी शीव रुग्णालयात दाखल केले. 35 टक्के भाजलेल्या कांता आणि त्यांच्या मुलीवर तिथे उपचार सुरू आहेत तर अमरावती यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दिपकविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. मात्र दिपक पळून गेल्याने वांद्रे पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी सात विशेष पथकांची नियुक्ती केली होती. एक टिम त्याच्या उत्तर प्रदेशातील गावी पाठवण्यात आली. मात्र दिपक हा मिरारोड येथे असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त संजय कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत ठाकरे यांच्या पथकातील विजय बेळगे, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव घाडगे, राकेश कांबळी, अमोल सोनावणे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. काल दुपारी तीन वाजता मीरारोड रेल्वे स्थानकात दिपक येताच त्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली. अटकेनंतर त्याला आज दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.