वाईट वेळ येण्यापूर्वी जीएसटीविरोधात एकत्र या; धनंजय मुंडेंचे आवाहन

0

मुंबई: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनातील तूट म्हणून केंद्र सरकारकडून अपेक्षित भरपाई मिळणे राज्यांना कठीण होणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अप्रत्यक्ष कर संकलनातील तूट म्हणून केंद्राने अद्यापही भरपाई दिलेली नाही. यापार्श्वभूमीवर १८ डिसेंबर जीएसटी परिषद होत असून जीएसटी विरोधात आवाज उठविण्याची गरज असल्याचे ट्वीट राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी केले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अध्यक्ष असलेल्या व विविध राज्यांचे अर्थमंत्री, महसूल मंत्री सदस्य असलेल्या जीएसटी परिषदेची १८ डिसेंबर रोजी बैठक होत आहे. तत्पूर्वी राज्यांना कर संकलनाचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.

केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली, राजस्थान, पंजाब या बिगर भाजपप्रणित राज्यांनी गेल्याच महिन्यात परिषदेकडे प्रश्न उपस्थित केला होता. या राज्यांतील करसंकलनाचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरत असल्याने या राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी केंद्राकडून भरपाई रुपात अर्थसहाय्य मागितले आहे. मात्र ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे राज्य आर्थिक अडचणीत सापडले आहे. हीच वेळ महाराष्ट्रात येऊ नये यासाठी एकत्र येत केंद्र सरकारला जाब विचारण्याची ही वेळ असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.