वाईन्सच्या दुकानात टोळक्याचा राडा

0

भोसरी : वाईन्सच्या दुकानात बेकायदेशीरपणे घुसून दुकानातील वाईन्सच्या बाटल्या फोडल्या. तसेच दुकानातील कामगारांना मारहाण केली. ही घटना रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास दापोडी येथील लकी वाईन्स या दुकानामध्ये घडली. सचिन किसन गोरे (वय 38, रा. उंड्री) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गोटू किंगरे, सुशांत (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्यांचे चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांचे दापोडी येथे लकी वाईन्स नावाचे दुकान आहे. रविवारी आरोपी त्याच्या चार ते पाच मित्रांसोबत सचिन यांच्या दुकानासमोर आला. त्याने बेकायदेशीरपणे दुकानात घुसून दुकानातील कामगार बबन आष्टे, इंद्रजित सोनवणे, सूर्यवंशी, प्रमोद कोल्हे यांना बेदम मारहाण केली. तसेच दुकानातील तीन हजार रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या फोडल्या. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे तपास करीत आहेत.