वाकडमध्ये ‘बीआरटी’साठी मिळकतींवर कारवाई

0

वाकड : डांगे चौक ते भूमकर चौकादरम्यान महापालिकेकडून बीआरटीएस रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या रस्त्यात बाधित होणार्‍या डांगे चौक ते भूमकर वस्ती येथील 18 मिळकतींवर महापालिकेने शुक्रवारी सकाळी कारवाई केली. या मिळकतींमध्ये पत्राशेड, व्यापारी गाळ्यांचा समावेश होता.

न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई
महापालिकेला डांगे चौक ते भूमकर चौकादरम्यान, बीआरटीएस रस्ता विकसित करायचा आहे. त्यासाठी काही जागा ताब्यात घेण्यात आली होती. परंतु, डांगे चौक ते भूमकरवस्ती परिसरातील काही बाधित नागरिकांनी महापालिकेस जागा देण्यास विरोध केला होता. सहा वर्षांपूर्वी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सोमवारी (दि. 17) न्यायालयाने बाधित नागरिकांना जागा महापालिकेला देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार भूसंपादन अधिकार्‍यांनी नागरिकांना नोटीस दिल्या होत्या. याठिकाणी 18 मिळकती आहेत. त्यामध्ये व्यापारी गाळे, पत्राशेड होते. महापालिकेने नागरिकांना गाळे खाली करण्याचे आवाहन केले. त्यानंतर नागरिकांनीही स्वत:हून गाळे खाली केले. त्यानंतर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती उपअभियंता व प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली.

तगडा पोलीस बंदोबस्त
महापालिकेचे सह शहर अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता विजय भोजने तसेच दोन जेसीबी, दोन डंपर, चार पोकलेन मशीन, महापालिकेचे 25 मजूर यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान एक पोलीस निरीक्षक, चार सहाय्यक पोलीस निरीक्षक, 25 पोलीस कर्मचारी, महिला पोलीस असा मोठा फौजफाटा तैनात होता.