वाकडमध्ये वाहनचालकावर गोळीबार

0

पिंपरी चिंचवड : सिगारेट घेण्यासाठी थांबलेल्या वाहनचालकावर गोळीबार झाल्याची घटना वाकड येथे घडली. यामध्ये वाहनचालक जखमी झाला आहे. ही घटना मुंबई-बेंगलोर महामार्गावर वाकड येथे शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. हरिओम मेहरसिंग सिंग (वय 30, रा. सुतारवाडी, पाषाण, मुळगाव राजस्थान) असे गोळीबारात जखमी झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे.

पिस्तूल पोटाला लावले…

वाकड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरिओम शनिवारी रात्री मुंबई-बेंगलोर महामार्गावरून कारमधून जात होते. रात्री साडेअकराच्या सुमारास महामार्गावरील हॉटेल कोल्हापुरी येथे एका पानटपरीवर ते सिगारेट घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी अनोळखी तिघेजण त्यांच्या मोटारीत येऊन बसले. हरिओम हे सिगारेट घेऊन पुन्हा कारमध्ये बसले. त्यावेळी कारमध्ये बसलेल्या तीन आरोपींनी त्यांच्या पोटाला पिस्तूल लावले, आणि कार पुढे घेण्यास सांगितले.

वाकड पोलिसात गुन्हा दाखल…

हरिओम यांनी ‘काय झाले?’ अशी विचारणा केली असता एकाने ‘तुला मरायचे आहे काय,’ असा दम दिला. यामुळे घाबरलेल्या हरिओम यांनी मोटारीतून उतरून हॉटेलच्या दिशेने पळ काढला. त्यावेळी एकाने हरिओम यांच्यावर गोळीबार केला. ती गोळी हरिओम यांच्या पायाला लागली. यामध्ये ते जखमी झाले. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.