वाकड : या परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी येथील नियोजित जलकुंभाची निविदा काढून कामाला सुरुवात करावी अशी मागणी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाकडमधील दत्त मंदिर रस्ता व कस्पटेवस्ती येथे मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प निर्माण झाले आहे. लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. परंतु या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी याच परीसरात स्वतंत्र जलकुंभ उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्याला मंजुरी ही मिळाली परंतु जागा निश्चित होत नव्हती. नगरसेवक संदिप कस्पटे यांनी निवडून आल्यापासून कसोशीने या कामाचा सतत पाठपुरावा केला आहे. प्रधिकरणाकडून या जलकुंभासाठी जागा लवकर निश्चित करुन मिळावी यासाठी प्राधिकरण व महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला. वेळोवेळी संबंधित अधिकार्यांच्या भेटी घेतल्या. अखेर अॅम्बियन्स हॉटेल नजीक कस्पटे वस्ती येथे सर्वे. नं. 209 येथे 30 गुंठे जागा प्राधिकरणाकडून महानगरपालिकेला हस्तांतरीत झाली. आता यानंतर 8 महिने झाले तरी देखील मनपाच्यावतीने निविदा प्रक्रिया पुर्ण झाली नाही. त्यामुळे या जलकुंभाच्या उभारणीस विलंब होत आहे असल्याचे कस्पटे यांनी म्हटले आहे.
वाकड परिसरात गेल्या 2 महिन्यांपासुन नुकताच पाऊसकाळा संपल्यानंतर देखील प्रचंड पाणीटंचाई सुरु आहे. पवना धरन परिसरात मुबलक पाणीसाठा असुन देखील केवळ वाकड परिसरात पुरेसा पाण्याचा साठा करण्यासाठी जलकुंभ उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे , उन्हाळ्या मध्ये ही परीस्थिती भीषण होणार आहे. या परिस्थितीत वाकड परिसरातील या जलकुंभाच्या कामात प्रशासनाकडुन होणारी दिरंगाई खुपच संतापजनक आहे.