वाकड : नागरिकांना भयमुक्त आयुष्य जगता यावे यासाठी अहोरात्र दक्ष राहणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कायम मोठा शारीरिक आणि मानसिक तणाव झेलत असतात. सुरक्षेची जबबादारी सांभाळताना पोलिसांना जास्त तणावाशी झगडावे लागू नये, यासाठी वाकड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्यांना लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्र या संस्थेच्या वतीने तणावमुक्तीचे धडे देण्यात आले.
मानसिक शांती लाभावी यासाठी संकल्पना
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी आपल्या अधिकारी आणि कर्मचार्यांना मानसिक शांती लाभावी आणि तणावातून मुक्ती मिळावी यासाठी ही संकल्पना अमलात आणली. कामाच्या उत्तम व्यवस्थापनाद्वारे ताण-तणावापासून सुटका करून घेण्याच्या पद्धती यावेळी शिकविण्यात आल्या. लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्र या सामाजिक संस्थेच्या वतीने वाकड पोलिसांचा अभ्यास वर्ग घेण्यात आला. या संस्थेच्या वतीने शहरातील विविध संस्था, शाळा, सरकारी कार्यालय खाजगी संस्था अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी ज्ञानप्रकाश यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
सकारात्मक पहा, बदल होईल
याच उपक्रमांतर्गत नुकतेच वाकड पोलीस ठाण्यात तणावमुक्ती व्यवस्थापनाचा अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला होता. यावेळी साधक के. जी. सावंत, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, सुनील पिंजण, सहायक निरीक्षक दत्तासाहेब लोंढे, संगीता घोडे, यांच्यासह वाकड ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या दरम्यान तणावाची विविध कारणे, नियमबाह्य कामे केल्याने होणारे दुष्परिणाम, हेतुपरस्पर केलेली कामे, अवास्तव अपेक्षा, प्रगती करण्यासाठी ताण घेणे अपिरिहार्य का? एखाद्या घटनेकडे, ताणाकडे सकारात्मकतेने पाहिल्यास होणारे बदल याविषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तणावातून सुटका न करून घेतल्यास स्वत:वर आणि कुटुंबावर होणारे दुष्परिणाम याबाबत ही माहिती दिली.