वाकड येथील सीमाभिंत बांधण्याच्या कामात ‘रिंग’

0

महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांचा आरोप

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने वाकड येथील जकातनाक्याच्या जागेसाठी सीमा भिंत बांधण्याच्या कामात रिंग झाली आहे. पात्र निविदाधारकांना निविदा पाकीट उघडू नये, अशी धमकी सत्ताधार्‍यांकडून दिली जात आहे, असा आरोप शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केला आहे. तसेच ठेकेदारांच्या पत्रांचा विचार न करता पात्र झालेल्या सर्व निविदा उघडण्यात याव्यात, अशीही मागणी त्यांनी पालिकेकडे केली आहे.

राजकीय दबाव
याबाबत आयुक्तांना श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, वाकड येथील आरक्षण क्रमांक 4/11 येथील जकातनाक्याच्या जागेसाठी सीमाभिंत घालण्यात येणार आहे. त्या कामाची निविदा पालिकेने 15 ते 30 डिसेंबर 2017 दरम्यान प्रसिद्ध केली. या कालावधीत सहा जणांनी निविदा भरली. त्यापैकी टेक्सन या ठेकेदाराने काही कागदपत्रे जोडली नव्हती. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले आणि पात्र निविदा धारकांची यादी 19 जानेवारी रोजी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. एस.एस.साठे, राहुल कन्स्ट्रक्शन, यश कीर्ती डेव्लपर्स अँड कॉन्ट्रॅक्टर, एस.बी.सवाई आणि पांडुरंग एंटरप्राययझेस हे पाच ठेकेदार पात्र ठरले होते. त्यापैकी मे. एस.एस.साठे गव्हर्मेंट व मे. राहुल कन्स्ट्रक्शन यांनी निविदा पाकीट उघडू नये, अशी पत्रे दिली आहेत. परंतु, ही पत्रे राजकीय दबावातून दिली असल्याचा आरोप कलाटे यांनी केला आहे.

निविदा उघडाव्यात
राहुल कन्स्ट्रक्शन यांनी 18 जानेवारी व मे. एस.एस.साठे गव्हर्न्मेंट यांनी 20 जानेवारी रोजी आम्ही निविदा ही चुकीने बिड केली असून ती उघडू नये तसेच आमची निविदा व अनामत रक्कम परत मिळण्याची विनंती केली आहे. परंतु, या ठेकेदारांवर राजकीय दबाव आल्यामुळेच त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या कामांमध्ये रिंग झाली आहे. पालिकेचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यासाठी ठेकेदारांच्या पत्रांचा विचार न करता पात्र झालेल्या सर्व निविदा उडण्यात याव्यात, अशी मागणी कलाटे यांनी केली आहे.

छोट्या कामातही दिला जातो दम
याबाबत राहुल कलाटे म्हणाले, ‘छोट्या-छोट्या कामात देखील सत्ताधारी रिंग करत आहे. ठेकेदांराना दम दिला जातो, हे अंत्यत चुकीचे आहे. निविदा भरुन दिल्या जात नाहीत. मोठ्या कामात तर ठेकेदारांवर किती दबाव येत असेल’.