जळगाव । गॅस सिलिंडर वाहून नेणार्या ट्रकमध्ये स्पार्कींग झाल्याने सिलिंडर्सचे एका पाठोपाठ एक असे प्रचंड स्फोट झाले. स्फोटाच्या प्रचंड आवाजामुळे वाकोद परिसर हादरुन गेला. जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील वाकोद नजीक शनिवारी रात्री ही थरारक घडली. मध्यरात्रीच्या एक वाजेनंतरही आगीचे लोळ सुरुच होते. सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही. आगीच्या भीतीमुळे 15 हजार लोकवस्तीचे वाकोद गाव खाली करण्यात आले होते. गॅस सिलिंडर भरलेली एक ट्रक जळगावहून औरंगाबादकडे जात होता. हा ट्रक वाकोद गावाजवळील साई पेट्रोलपंपानजिक आली असता ट्रकच्या कॅबिनमधून धूर निघत असल्याचे ट्रकचालकाच्या लक्षात आले. चालकाने जवळच असलेल्या पेट्रोलपंपावरील अग्निरोधक यंत्र मागविले. त्याआधारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत असतानाच ट्रकच्या डिझेलच्या टाकीचा अचानक स्फोट झाला आणि ट्रकमधील गॅस भरलेल्या सिलिंडर्सचे स्फोट होऊ लागले.
ट्रक जळून खाक
सिलिंडर्सचे एकामागून एक स्फोट होत असल्याने परिसरात प्रचंड आवाज येऊ लागला. साधारण 100 ते 150 फूट अंतरावर हे सिलिंडर्स हवेत उडत होते. परिसरातील लोक आवाजामुळे हादररुन गेले. आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. जामनेर, जळगाव, एरंडोल तसेच सिल्लोड पालिकांचे अग्निशमन बंब मागविण्यात आले. यासोबतच जैन फॉर्म हाऊसमधूनही पाण्याचा टँकर मागविण्यात आला.
गिरीश महाजनांची भेट
रात्री उशीरापर्यत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरु होते. तसेच काही शेतकजयांकडे असलेले पाण्याचे टँकरही घटनास्थळी पोहचविण्यात येत होते. या घटनेमुळे जळगाव- औरंगाबाद महामार्गावरील दोन्ही बाजूंकडील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रशासनाने सहा रुग्णवाहिका तिथे तयार ठेवल्या आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली.
आठवड्यातील दुसरी घटना
वाकोद येथे तीन दिवसापूर्वी एका घरात स्वयंपाक करतांना अचानक गँस लिकेजेस मुळे स्फोट होऊन दोन महिला ठार झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतांनाच ही दुसरी घटना घडल्याने वाकोद परिसरातील नागरिकांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. भितीदायक वातावरणामुळे अनेक जण बाहेर गावी जात असल्याचे दिसून येत आहे.