वाघझिर्‍याच्या अट्टल दुचाकी चोरट्याच्या ताब्यातून चोरीच्या 13 दुचाकी जप्त

यावल : अट्टल दुचाकी चोरट्याच्या यावल पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून आरोपीच्या ताब्यातून चोरलेल्या 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या. अर्जुन नांदला पावरा (वाघझिरा, ता.यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

जळगाव जिल्ह्यातून लांबवल्या दुचाकी
वाघझिरा येथील रवींद्र दगडू महाजन यांची 28 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 सी.एस 7214) ही दुचाकी चोरीला गेल्याने 23 जून रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या तपासात संशयीत आरोपी अर्जुन नांदला पावरा याचे नाव पुढे आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. आरोपीने जिल्हाभरातील नशिराबाद जळगाव, अमळनेर आदी शहरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली तसेच सातपुड्यातील विविध आदिवासी पाड्यार विक्री केलेल्या 13 दुचाकी काढून दिल्या. आरोपीकडून आणखी काही दुचाकी चोरींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

यांनी उघडकीस आणले गुन्हे
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रभारी पोलीस उपअधीक्षक विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, मुजफ्फर खान सिकंदर तडवी, असलम खान, संजय तायडे, सुशील घुगे, राजेंद्र वाडे, रोहिल गणेश, राहुल चौधरी, भूषण चव्हाण आदींनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. तक्रारदाराने आपल्या दुचाकीची ओळख पटवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केले आहे.