Murder of youth in Waghli : Pasar accused in Jalgaon crime branch’s net चाळीसगाव : तालुक्यातील वाघळी येथे एकमेकांकडे पाहिल्याच्या कारणावरून डोक्यात लोखंडी रॉड आणि पोटात चाकू भोसकून मोहन विजय हडपे (18) या तरुणाचा बुधवार, 12 ऑक्टोंबर रोजी खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात पसार संशयीत साजीद मुसा खाटीक (रा.वाघळी, ता.चाळीसगाव) याला मध्य प्रदेशातील खेतिया येथून गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
चाकूने भोसकून केला होता खून
चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील मोहन विजय हडपे (18) या तरुणाचा गावातीलच सैय्यद मुसा खाटीक, साजीद मुसा खाटीक, आदिल साजीद खाटीक, तनवीर साजीद खाटीक, समीर सय्यद खाटीक यांनी लोखंडी रॉड डोक्यात टाकून व पोटात चाकूने भोसकून खून केल्याची घटना 12 ऑक्टोंबर रोजी घडली होती. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील प्रमुख संशयीत साजीद मुसा खाटीक हा घटना घडल्यापासून पसार होता. तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
संवेदनशील प्रकरण असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे, अमोल देवढे, सुधाकर अंबोरे, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, विनोद पाटील, उमेश गोसावी, प्रितम पाटील, मुरलीधर बारी अशांच्या पथकाने मध्यप्रदेशातील खेतिया या ग्रामीण भागात दडून बसलेल्या साजीद मुसा खाटीक याला अटक करण्यात आली. आरोपीला चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.