वाघळी शाळा अश्लिल सिडीप्रकरणी अखेर नगरसेवक बंटी ठाकूर पोलिसांच्या शरणी !

0

चाळीसगाव- माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनीला अश्लिल चित्रफित दाखवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी चाळीसगाव न.पा.शिक्षण समिती सभापती बंटी उर्फ सूर्यकांत ठाकूर यांचा जामीन अर्ज खंडपीठापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळल्याने अखेर ते स्वत:हून ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाले. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना दिलेल्या पत्रात ठाकूर यांनी आपल्यावर केलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरीत असून पोलीसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

वाघळी येथील एका विद्यार्थीनीला अश्लिल चित्रफीत दाखवल्याप्रकरणी महिन्याभरापूर्वी बंटी ठाकूर यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते फरार होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर बंटी ठाकूर यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला मात्र न्यायालयाने तो फेटाळल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. तेथेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. अखेर त्यांनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारणात नियमीत जामीन देखील मिळायला नको असे सांगत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. तातडीने पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिले. त्यामुळे ठाकूरांना पोलीसांना शरण जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानंतर त्यांनी काल रात्री ११.४५ वाजता ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाले.

गुन्हा दाखल झालेनंतर मला अटक होण्याची भिती असल्याने मी फौजदारी संहिता कलम ४३८ प्रमाणे न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. मात्र ते फेटाळल्याने मी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होत असून या गुन्ह्याच्या तपासकामी संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे . एकंदरीत सुर्यकांत उर्फ बंटी ठाकूरांना पोलीसांना शरण जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आपल्या साठी न्यायालयाचे सर्व दरवाजे बंद झाले. न्यायालयाच्या निर्णयाचा सम्मान करून, शरणागती पत्करणे हा अखेरचा पर्याय शिल्लक राहिला असल्याने त्यांनी शरणागती पत्करली आहे . बंटी ठाकुर यांनी वापरत असलेले दोन्ही मोबाईल हॅन्डसेट पोलीसांकडे दिले. ग्रामीण पोलीसांनी कार्यवाही करून त्यांना अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र रसडे हे करीत आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी जनशक्तीशी बोलताना दिली आहे