वाघांच्या मृत्यूची चौकशी करा

0

धुळे । तालुक्यातील गोंदूर येथे काल सायंकाळी ग्रामसेवकाने ग्रामपंचायत कार्यालयातील स्वच्छता गृहात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. यावेळी मृत ग्रामसेवकाने लिहिलेल्या चिठ्ठीत जिल्हा परिषद सदस्यांना उद्देशून ’आपले काम करुन शकलो नाही, मला माफ करा’ असा मजकूर लिहिला आहे. ते सदस्य होण? त्यांचे कोणते काम वाघ करु शकले नाहीत? असे प्रश्‍न उपस्थित होत आहे. आज जुने जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाजवळ ग्रामसेवक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी एकत्र आले होते. संघटनात्मक पातळीवर या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून ग्रामसेवक वाघ यांच्या गुढ मृत्यूची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले आहे.

स्वच्छतागृहात गळफास अवस्थेत मृतदेह
संजय भालेराव वाघ असे या आत्महत्या करणार्‍या ग्रामसेवकाचे नाव असून काल सायंकाळी 6.30 च्या सुमारास गोंदूर ग्रामपंचायत कार्यालयातीलस्वच्छता गृहात एका हुकला दोरी बांधून त्यांचा गळफास लावून घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. या माहितीची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, पश्‍चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सपोनि ताठे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. यावेळी मृत संजय वाघ यांच्या भाच्याने त्यांचे शव फासावरुन उतरविण्यास विरोध दर्शविला. तथापि मयत संजय वाघ यांचे भाऊ घटनास्थळी आल्यावर त्यांचे शव फासावरुन उतरविण्यात आले. आज सकाळी जुने जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाजवळ संजय वाघ यांच्या नातलगांसह ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी गर्दी केली होती. कामाच्या तणावातून हा प्रकार घडला असल्याने संबंधित अधिकार्‍यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

ग्रामसेवकांनी केली निदर्शने
ग्रामसेवक संजय वाघ यांच्या आत्महत्येचे गुढ वाढले असून कामाच्या तणावामुळेच ही आत्महत्या झाली असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने केला आहे. या संदर्भात संघटनेतर्फे जिल्हा परिषद सीईओ यांना देण्यात आले आहे. तसेच त्याची प्रत जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आली. शिवाय, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह ग्रामसेवकांनी निर्दशनेही केलीत. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भामरे, सचिव प्रविण मोरे, एन.ए.बिरारीस, एस.के. पावरा, सुनंदा राठोड, एस.पी. पाटील, एम.एस. पेंढारकर, एस.बी. सोनवणे, एन.बी. देवरे, पी.ए.शिंदे, जे.एम.गवळी, स्मिता तोरवणे, सुनिता अहिरे आदींसह ग्रामसेवक उपस्थित होते.

अतिताणामुळे वाघ यांचा गुढ मृत्यू
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोंदूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संजय वाघ हे 15 रोजी कार्यालयीन वेळेत कामकाज करीत असतांना वरिष्ठ कार्यालयाच्या शासकीय कामाच्या अतिताणामुळे वाघ यांचा गुढ मृत्यू झाला आहे. दोषींवर कारवाई करण्यात येत नाही व न्याय मिळत नाही. तोपर्यंत सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी या घटनेचा निषेध म्हणून जिल्हाभर संपूर्ण काम बंद आंदोलन करीत आहेत. तरी दोषींवर त्वरीत कारवाई करावी तसेच वाघ यांच्या भ्रमणध्वनीचे मागील 15 दिवसांचे कॉल रेकॉर्डस्ची तपासणी करावी, अशी मागणीही संघटनेतर्फे केली आहे.