डोलारखेड्यात शोककळा ; वनविभाग लावणार ट्रॅप कॅमेरे
मुक्ताईनगर :- वढोदा वनपरीक्षेत्र अंतर्गत डोलारखेडा फॉरेस्ट कॅम्पार्टमेंट 517 लगत शेती शिवारात शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास लक्ष्मण गणपत जाधव (65, डोलारखेडा ता. मुक्ताईनगर) या शेतकर्याचा पट्टेदार वाघाने बळी घेतल्यानंतर शनिवारी शोकाकुल वातावरणात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर शेतकरी व शेतमजुरांमध्ये घबराट पसरली असून शेत-शिवारात लोक जाण्यापासून धजावत आहेत. वाघाच्या शोधासाठी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावण्यासह गस्त वाढवण्याचे नियोजन केले आहे. शेतात जाताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले असून मयत जाधव यांच्या कुटुंबियासह रविवारी वा सोमवारी एक लाखांची तातडीची मदत देण्यात येणार आहे.
माजी मंत्री खडसेंसह अधिकार्यांची भेट
शेतकरी लक्ष्मण जाधव हे नेहमी प्रमाणे शुक्रवारी सकाळी 11 वाजता शेतात गेल्यानंतर रात्री न परतल्याने त्यांचा शोध घेतला असता आठ वाजेच्या सुमारास पट्टेदार शिकाराने त्यांचा बळी घेतल्याची बाब उघड झाली होती. या घटनेनंतर डोलारखेडा गावात मोठी घबराट पसरली होती. दुर्दैवी घटनेनंतर शनिवारी माजी मंत्री एकनाथराव खडसे, उपवनसंरक्षक डी.डब्ल्यू.पगार (डीएफओ), सहाय्यक वनसंरक्षक एन.ए.पाटील, कुर्हा वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण, मुक्ताईनगरचे वनक्षेत्रपाल पी.टी.वराडे, जामनेरचे वनक्षेत्रपाल बी.बी.जोमीवाले आदींनी डोलारखेडा येथील जाधव कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. खडसे यांनी तातडीच्या मदतीसह आठ लाखांची मदत मिळवून देण्याचे प्रसंगी आश्वासन दिले. दरम्यान, वन परीक्षेत्रात चार मोठे पट्टेदार वाघ तर तीन छावे असे एकूण सात पट्टेदार वाघ आहेत. वाघ नरभक्षक झाल्याने ग्रामस्थ दहशतीखाली आहेत तर चाळीसगाव तालुक्याप्रमाणे दुर्दैवी घटना घडण्यापूर्वीच दखल घेणे गरजेचे आहे.