वाघाला कुरवाळणे अशक्य : उद्धव ठाकरे

0

भाजपचे बिनपंखाचे विमान उडतेच आहे…

मुंबई । शिवसेना आमच्या सोबत रहावी, अशी इच्छा व्यक्त करणार्‍या भाजपला शिवसेनेने फटकारले आहे. ‘शिवसेनेचा वाघ हा पिंजर्‍यातील वाघ नसल्याने तो राज्याच्या व राष्ट्राच्या प्रश्‍नांवर गर्जना करीत आहे. वाघाला रोखणे किंवा कुरवाळणे आता शक्य नाही,’ असे स्पष्ट करत भाजपबरोबर युती न करण्याचे जणू संकेतच शिवसेनेने दिले आहेत. भाजपच्या स्थापना मेळाव्यात मुंबईत येऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याआधी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार असल्याचे स्पष्ट केले होते. यापार्श्‍वभूमीवर आता शिवसेनेने भाजपबरोबर युती होणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका मांडली.

आगामी लोकसभा, विधानसभा 2019 चे चित्र पूर्णपणे वेगळे असेल, परंतु भाजप अजूनही 2014 च्या सुवर्णकाळात रमून बसला आहे. भाजपला मित्रांची गरज नाही. ते मजबूत व स्वयंभू आहेत. शिवसेनेने सोबत असावे असे त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उडत उडत सांगितले आहे. हा सद्विचार त्यांना 2014 साली सुचला नाही व सत्ता मिळाल्यावरही ते विनय हरवून बसले. त्यांचे बिनपंखांचे विमान ढगात उडाले ते उडतेच आहे. आता उतरवायचे म्हटले तर त्यासाठी जमीन नाही, असा टोला हाणतानाच सुवर्णकाळातील सुवर्ण कौले फुलपूर-गोरखपूरमधून उडून गेल्यावर काही गोष्टी सुचू लागल्या. भाजपने सुवर्णकाळाचे स्वप्न पाहावे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत!, असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला काढला आहे.