वाघिणीचा मृत्यू वनविभागाच्या अनास्थेचा बळी !

0

तीन वर्षात दुसर्‍या वाघिणीचा मृत्यू ; वन्यप्राण्यांवर मॉनिटरींगचा अभाव

भुसावळ:- तालुक्यातील वढोदा वनपरीक्षेत्रातील डोलारखेडाजवळील सुकळी शिवारात सुमारे 16 वर्षीय वयोमान असलेल्या वाघिणीचा मृत्यू झाल्याने वनविभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वाढत्या वयोमानामुळे या वाघिणीचा मृत्यू झाल्याचे बोलले जात असलेतरी यातून वनविभागाची अनास्थादेखील पुन्हा उघड झाली आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी देखील एका वाघिणीचा याच परीसरात अपघाती मृत्यू झाला होता हेदेखील विशेष! वाघिणीचा मृत्यू होण्याच्या काही तासांपूर्वीच या वाघिणीने या भागात एका बकरीचा फडशादेखील पाडल्याची माहिती आहे. वाघिणीचा मृतदेह आढळल्यानंतर वनविभागाची यंत्रणा खळबडून जागी झाली असून अनेक वरीष्ठ अधिकार्‍यांनी शुक्रवारी सायंकाळी भेटी दिल्या.

वन्य प्राण्यांवर मॉनिटरींगचा अभाव
मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनपरीक्षेत्रात डोलारखेडा शिवारात आतापर्यंत अनेकदा वाघाचे दर्शन झाले असून अन्य पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महिनाभरापूर्वीच डोलारखेडा येथील शेतकर्‍यावर हल्ला झाल्याने त्याचाही मृत्यू झाला होता. या परीसरात वाघाचा अधिवास मोठ्या प्रमाणावर असताना वनविभागाने ठोस अशा उपाययोजना केल्या नसल्याने वन्यप्राण्यांनी मानवी वस्तीकडे धाव घेणे सुरू केले आहे. ट्रॅप कॅमेरे लावण्याशिवाय या भागात वनविभागाने ठोस अशा उपाययोजनाच केल्या नाहीत. वढोदा संवर्धन राखीव परीक्षेत्र वाघांचे प्रजनन क्षेत्र असतानाही या भागात अभ्यासू अधिकार्‍यांची नितांत आवश्यकता आहे मात्र या प्रकाराकडे एकूणच वनविभागाने डोळेझाक केल्याचे दिसून येते. डोलारखेड्यानंतर अनेकदा वाघाने दुईकडे धाव घेतली होतत अर्थात जंगलात पाणवठ्यांचादेखील अभाव दिसून येतो त्यामुळेच ते मानवी वस्तीत धाव घेत असल्याचे बोलले जात आहे.

वाघाचा मुक्त संचार, उपाययोजना शून्य
मुक्ताईनगरसह रावेर व यावल तालुक्यात अनेकदा पट्टेदार वाघासह बिबट्याने दर्शन घेत पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे मात्र असे असतानाही त्याबाबत उपाययोजना करण्यात वनविभागाला यश आलेले नाही त्यामुळे शेत-शिवारात जाण्यासही मजूर धजावत नसल्याचे चित्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 28 डिसेंबर रोजी वाघीणीच्या पायाला जखम झाल्याने तिला धड चालताही येत नव्हते तर असे असताना वनविभागाने परवानगी घेऊन वाघिणीवर वेळीच उपचार केले असता तर कदाचित चित्र वेगळे असते, असेही बोलले जात आहे.

‘त्या’ वाघिणीचा वयोमानाने मृत्यू
डोलारखेडा शिवारातील सुकळी शिवारात 16 वर्षीय वयोमान असलेल्या वाघिणीचा मृतदेह शुक्रवारी दुपारी 12 वाजता आढळला होता. सुकळी शिवारातील जयराम पाटील हे शेतकरी शेतात गेल्यानंतर त्यांना वाघीण बसलेली आढळली. सुरुवातीला त्यांना वाघीण शेतात बसल्याचे जाणवल्याने त्यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली तर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सावधपणे वाघिणीला पाहिल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे जाणवले. ही वार्ता पसरताच मोठा जमाव जमला होता मात्र वनविभागाच्या अधिकार्‍यांनी जमावाला पाचशे मीटर अंतरापर्यंत रोखून धरले.

आज होणार शवविच्छेदन
16 वर्षीय वाघिणीचा वयोवृद्ध झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. धुळे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक टी.एन.साळुंखे व जळगावचे वनउपसंरक्षक डी.डब्ल्यू.पगार हे शुक्रवारी रात्री उशिरा दाखल होणार असून त्यांच्या पाहणीनंतरचवारऐवजी शनिवारी या वाघिणीचे शवविच्छेदन केले जाणार असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक एस.आर.पाटील म्हणाले. वाघिणीचा मृत्यू ओढवल्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक एस.आर.पाटील, पी.आर.पाटील, रावेर वनक्षेत्रपाल आर.जी.राणे, मुक्ताईनगर वनक्षेत्रपाल पी.टी.वराडे, मोबाईल स्कॉड जळगाव विभागाचे धनंजय पवार, जिल्हा पशूधन सहाय्यक आयुक्त डॉ.संजय गायकवाड, मानद वन्यजीव संरक्षक राजेश ठोंबरे (चाळीसगाव) तसेच मुक्ताईनगर व वढोदा वनविभागाचे महिला कर्मचार्‍यांनी घटनास्थळी तळ ठोकला आहे.