तपाधिकारी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह संशयित न्यायालयात हजर
जळगाव : वाघुर पाणी पुरवठा योजनेतील अपहारप्रकरणी सहा जणांविरोधात बुधवारी जिल्हा न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यावेळी गुन्ह्याचे तपासअधिकारी चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह संशयित न्यायालयात हजर होते.
तत्कालिन नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांनी तत्कालिन जळगाव नगरपालिकेच्या वाघुर पाणी पुरवठा योजनेत माजी नगराध्यक्ष,नगरसेवक, अधिकारी व पदाधिकारी यांनी 30 कोटीचा तात्पुरता व 12 कोटी रुपयांचा कायमचा अपहार केल्याची तक्रार केली होती. त्यानुसार शहर पोलीस स्टेशनला गु.र.नं.69/2012 भादवि कलम 404, 409, 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. वाघुर पाणी पुरवठा योजनेचे तत्कालिन नगरपालिकेच्या पदाधिकारी व अधिकार्यांनी संगनमत करुन अटीशर्तीवर तापी प्रिस्टेट कंपनीला दिले. त्यासाठी 25 टक्के इतकी रक्कम अॅडव्हान्स म्हणून देण्यात आली. त्यामुळे नगरपालिकेचे 6 कोटी 13 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या संशयितांची होती हजेरी
तपासाधिकारी प्रशांत बच्छाव यांनी या गुन्ह्यातील संशयित आरोपींना 5 डिसेंबर रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार बुधवारी दोषारोपपत्र दाखल करताना या गुन्ह्यातील संशयित आरोपी जळगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रदीप ग्यानचंद रायसोनी, सिंधू विजय कोल्हे, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, सदाशिव गणपतराव ढेकळे व तत्कालिन मुख्याधिकारी पी.डी.काळे न्यायालयात हजर होते. गुन्ह्यातील सहावे आरोपी मोतीलाल कोटेचा यांचे निधन झालेले आहे.