तीन वर्षानंतर पाण्याची पातळी वाढली
जळगाव– जळगाव शहराला पाणीपुरवठा करणार्या वाघूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणात 79 टक्के पाणीसाठा असून दोन वर्ष पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती मनपाचे पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांनी दिली.
गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्यानेे जळगावकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.उन्हाळ्यात वाघूर धरणात केवळ 25 ते 30 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि मनपा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले होते.परिणामी शहरातील दोन दिवस होणारा पाणी पुरवठा तीन दिवसाआड करण्यात आला आहे. मात्र यंदा समाधानकारक पाऊस झाला असून 79 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. परतीच्या पावसात वाघूर धरण पुर्ण भरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
यंदा समाधानकारक पाऊस
यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. 2017 मध्ये 79 टक्के पाणीसाठा होता. तीन वर्षानंतर वाघूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यस्थितीला 79 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जळगावकरांसह जामनेर तालुक्यातील शेतकर्यांनाही दिलासा मिळाला आहे.
232.450 मिटर पाणी पातळी
वाघूर धरणाची उच्चतम पाणीपातळी 234.10 मिटर असून आजमितीला 232.450 मिटर पाणी पातळी आहे.धरणातून 220.200 मिटर पाणीपातळीवरुन मनपातर्फे पाणी उचल केली जाते. सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा किमान दोन वर्ष पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती अभियंता डी.एस.खडके यांनी दिली.