तहसील प्रशासनाने ठेकेदाराला बजावली नोटीस ; कामासाठी वापरली गिरणाऐवजी वाघूरची रेती
भुसावळ- तालुक्यातील सुनसगाव जवळील वाघूर नदीवर तब्बल 53 लाख रुपये खर्चून के.टी.वेअरचे बांधकाम केले जात आहे मात्र या कामासाठी गिरणी नदीऐवजी वाघूरची नदी वापरून अन्य साहित्यही हलक्या दर्जाचे वापरून काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार आल्यानंतर आमदार संजय सावकारे यांच्यासह जिल्हा परीषद पल्लवी सावकारे, जिल्हा परीषद सदस्य लालचंद पाटील यांनी हे काम बंद पाडले. तहसीलदार विशाल नाईकवडे यांनी पंचनामा करून संबंधित ठेकेदारास नोटीस बजावल्याने ठेकेदाराचे धाबे दणाणले.
जीर्ण बंधार्याची 53 लाखातून दुरुस्ती
वाघूर नदी परीसरातील सुनसगाव, बेलव्हाय, जळगाव खुर्द, खेडी आदी गावातील शेती सिंचनाखाली यावी यासाठी नदीमध्ये के.टी.वेअर बंधारा बांधण्यात आला मात्र बंधारा जीर्ण झाल्याने त्याच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परीषदेने 53 लाख रुपये मंजूर केले होते तर हे काम मुक्ताईनगर येथील सचिन भोंबे यांनी घेतल्याचे सांगण्यात आले. बांधकामासाठी 20 एम.एम. उभी तर 10 एम.एम.आडवी आसारी वापरण्यात यावी तसेच ड्रील मशिनने होल करून या आसार्या वापरण्यात याव्या, असे अंदाजपत्रकात नमूद होते शिवाय गिरणा नदीची रेती बांधकामासाठी वापरण्यात यावी, असे निकष असतानाही ठेकेदाराने सर्वच निकषाला हरताळ फासल्याचे लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत आढळून आले. वाघूर प्रकल्पातून पावसाळ्यात नदीला पाणी सोडताच पहिल्याच पुरात हा बंधारा वाहून जाईल, अशी स्थिती असल्याने आमदार संजय सावकारे व दोन्ही जिल्हा परीषद सदस्यांनी हे बांधकाम बंद पाडत तीव्र संताप व्यक्त केला.
भर उन्हात कामाचा पंचनामा
रविवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास आमदार संजय सावकारे, जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे, नशिराबाद गटाचे जिल्हा परीषद सदस्य लालचंद पाटील, किशोर पाटील (भुसावळ), भालचंद्र पाटील, सुनसगाव सरपंच किशोर सावकारे, बेलव्हायचे सरपंच यांनी नागरीकांच्या तक्रारी असल्यामुळे कामाला अचानक भेट दिली व कामाची पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या कामावर वापरण्यात येत असलेल्या रेतीची कोणतीही परवानगी न घेता किंवा रॉयल्टी न भरताच रेतीचा वापर करण्यात येत असल्याचीही माहिती तहसीलदार विशाल नाईकवडे यांनी दिली. सुमारे 100 ब्रासच्यावर रेतीचा वापर केला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यावेळी नायब तहसीलदार संजय तायडे, तलाठी प्रवीण मिश्रा उपस्थित होते.
केवळ आठ व 10 एम.एम. आसारीचा वापर
या कामासाठी उभी 20 एम.एम. आकाराची आसारी वापरण्यात यावी, असे नमूद असतांनाही केवळ आठव 10 एम.एम. आसारी वापरण्यात येत असल्याचे दिसून आले तर आसारी उभी करतांना बंधार्याच्या भिंतीमध्ये कोणतेही लिक्विड न वापरता केवळ त्या उभ्या करण्यात आल्या आहे. तसेच गिट्टी सोबतच नदीतील गोट्यांचा सर्रास वापर करण्यात येत असून नदीतील मातीमिश्रीत रेतीचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने आमदार सावकारे यांनी संबंधित अधिकार्यांना भ्रमणध्वनीवरून चांगलेच खडसावले.
निकृष्ट कामामुळे काम बंद पाडले -आमदार सावकारे
एकाच पावसात बंधारा वाहून जाईल, अशा निकृष्ट पद्धत्तीने ठेकेदाराकडून काम सुरू होते. के.टी.वेअरमध्ये पाणी साचावे या उद्देशाने बंधार्याच्या कामास मंजुरी मिळाली मात्र निविदेतील अटी व शर्तीचा भंग करीत ठेकेदार काम करीत असल्याचे आढळून आले. या संदर्भात वरीष्ठ अधिकार्यांनी दूरध्वनीवरून बोलणे झाले. या कामावरील साईट पाहणार्या अधिकार्यावर कारवाईची मागणी केली असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.