वाघोलीत नागरिकांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा

0

पुणे । पायाभूत समस्यांची वणवण असल्याने वाघोलीतील स्थानिक सोसायटीधारकांनी वाघोली वाचवाचा नारा देत वाघोली ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. सोसायटींना पाणीपुरवठा, कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन, वाहतुकीचे नियोजन, अंतर्गत रस्ते सुधारणा व वीजेचा नियमीत पुरवठा या मागणी यावेळी वाघोली हाउसिंग सेासायटी असोसिएशनच्या वतीने करण्यात आल्या.

वाघेश्‍वर मंदिराजवळ जमून चर्चा
वाघोली परिसरातील सोसायटीधारक वाघेश्‍वर मंदिराजवळ जमून त्यांना भेडसाविणार्‍या समस्याबाबत चर्चा केली. यानंतर तेथून त्यानी ‘वाघोली वाचवा, मी वाघोलीकर, आमच्या गरजा पूर्ण करा’चा नारा देत ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला. यावेळी त्यानी हातात फलक धरले होते. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. मागण्यांचे निवेदनही याप्रसंगी देण्यात आले.

सोसायटींना टँकरने पाणीपुरवठा करावा
आमच्या सदनिकांची नोंद नाही. त्यामुळे आम्हाला सुविधा मिळत नाही. सदनिकांची नोंद करण्यासाठी सविस्तर काय प्रक्रिया आहे ते सांगा. ग्रामपंचायतीने सोसायटींना टँकरने पाणीपुरवठा करावा. डेपोतील कचरा जाळला जातो. त्याचा खूप त्रास होतो. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. ते बंद करा. ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीधारक यांची संयुक्त समिती तयार करा. अशा मागण्या यावेळी त्यानी मांडल्या. तुमच्या बिल्डरने पूर्ण कागदपत्रे सादर केल्यानंतर आम्ही त्याची वेळेवर नोंद करू. पाण्याची नवीन योजना व कचर्‍यावर प्रकल्प उभारण्यासाठी कार्यवाही सुरू आहे, असे आश्‍वासन उपसरपंच व सदस्यांनी दिले.यावेळी पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, उपसरपंच समीर भाडळे, संजय सातव, मच्छींद्र सातव, रामकृष्ण सातव, अनिल सातव उपस्थित हेाते.