वाघोलीत ‘पीएमआरडीए’चे क्षेत्रिय कार्यालय

0

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उदघाटन; ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून न घेतल्यामुळे नाराजीचा सूर

वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथे ‘पीएमआरडीए’चे क्षेत्रिय कार्यालयाचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शनिवारी (दि.27) करण्यात आले. कार्यालय झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय थांबणार आहे.‘पीएमआरडीए’च्या हद्दीमध्ये क्षेत्रिय कार्यालये नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात वाघोली येथून करण्यात आली. जि.प.शाळेची एक छोटीशी खोली कार्यालयासाठी देण्यात आली आहे. क्षेत्रिय कार्यालयाच्या उद्घाटनाला पालकमंत्री येणार असल्याने त्यांच्या समोर वाघोलीतील कचरा, पाणीपुरवठा अशा निर्माण झालेल्या गंभीर समस्या मांडता येतील, अशी अपेक्षा ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांना होती. मात्र पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन करून निघून गेले.

ग्रामस्थांनी गंभीर बनलेली कचरा समस्येसह अन्य समस्या मांडण्याचा प्रयत्न केला परंतु पालकमंत्र्यांनी कोणतीच समस्या ऐकून घेतली नाही. तोंडी नको, लेखी निवेदन द्या असे सांगून ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून न घेता पालकमंत्री यांनी वेळ मारून नेली. पालकमंत्र्यांनी ‘पीएमआरडीए’च्या एका छोट्याशा खोलीचे उद्घाटन करण्यासाठी वेळ मिळाला मात्र स्थानिकांच्या गंभीर समस्या ऐकण्यासाठी त्यांना वेळ नसल्याचा सूर उपस्थित ग्रामस्थांमधून ऐकू येत होता. याप्रसंगी आमदार बाबुराव पाचर्णे, रामभाऊ दाभाडे, सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच संदीप सातव, रोहिदास उंद्रे, गणेश कुटे, समीर भाडळे, जयप्रकाश सातव, शिवदास उबाळे, महेंद्र भाडळे, सुधीर भाडळे, वंदना दाभाडे, अर्चना कटके, हरिभाऊ पाचारणे, किसान जाधव, मधुकर दाते, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

वाघोली व परिसरातील नागरिकांची सोय

वाघोली ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जि. प. शाळेच्या खोलीमध्ये पीएमआरडीएचे क्षेत्रीय सुरू झाले असून कर्मचार्‍यांची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. वाघोली व परिसरातील नागरिकांना पीएमआरडीए कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागू नये व संबंधित कामे क्षेत्रिय कार्यालयाच्या माध्यमातूनच व्हावी या उद्देशाने क्षेत्रिय कार्यालय सुरू करण्यात आले आहे.