वाघोली । येथील तुकाराम महाराजनगरमधील अंतर्गत रस्ता राजकीय कुरघोडींमुळे अनेक दिवसांपासून रखडला होता. त्या रस्त्याला अखेर मुहूर्त मिळाला. उपसरपंच समीर भाडळे यांच्या सहकार्याने या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
वाघोली येथे काही ठिकाणांच्या अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यातील संत तुकाराम महाराजनगरमधील रस्त्यावरून अनेक दिवसांपासून राजकीय हेवेदावे आणि कुरघोडी सुरू आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. त्या रस्त्याच्या कामाला लोक वर्गणीतून आणि उपसरपंचांच्या पुढाकाराने अखेर सुरुवात झाली. उपसरपंच समीर भाडळे व माजी जि.प. सदस्य रामदास दाभाडे यांच्या सहकार्याने या कामाला मुहूर्त सापडला आहे.या भागात दोन मोठे बिल्डर आहेत. खरेतर त्यांनी हा रस्त्याचे काम करायला पाहिजेत होते; परंतु हा रस्ता खासगी मालकीचा असल्याने अडचणी येत होत्या. मात्र उपसरपंच भाडळे यांची मध्यस्थी करून हा रस्ता दुरूस्त करण्याचे ठरविले आणि लोकांना प्रोत्साहन देऊन लोकवर्गणीच्या सहभागातून या कामाला सुरुवात झाली. भाडळे आणि दाभाडे यांच्या सहकार्याने तात्पुरता वाद मिटवून रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी सुधीर भाडळे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, जाधव महाराज, नंदु भाडळे, संतोष मुळीक, रामभाऊ सातव, निलेश मेटे, प्रमिला सातव, पार्वती दोरगे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.