वाघोली – गेल्या अनेक दिवसांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केल्यामुळे असंख्य गोरगरीब कुटुंबांना काम नसल्यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाघोली (ता. हवेली) येथे 12 हजार गरजूंची तीन महिन्यांपर्यंत घरपोच जेवण देण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली आहे. तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
बाहेर राज्यातून कामानिमित्ताने आलेले कामगार, स्थानिक गोरगरीब यांना काम नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची पाळी येऊ नये यासाठी वाघोली ग्रामपंचायतीकडून दोन वेळेचे जेवण घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या जेवणामध्ये चपाती, पुरी, भात, व्हेज पुलाव, भाजी आहे. पंचायत समितीचे सदस्य सर्जेराव वाघमारे म्हणाले की, वाघोली येथे मजुरांची संख्या जास्त आहे. मोफत अन्नछत्राचा उपक्रम लॉकडाऊनचा कालावधी वाढला तरी कायम ठेवणार आहे.