वाघोलीवासीयांचा पीएमआरडीए कार्यालयावर मूक मोर्चा

0

लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे ; 15 सप्टेंबरला प्रत्यक्ष कामाला सुरुवात

वाघोली : वाघोली गावातून मोठ्या प्रमाणात निधी मिळत असूनही पीएमआरडीएने गावाला अद्याप कुठल्याही मुलभूत सुविधा पुरविलेल्या नाहीत. वारंवार मागणी करून देखील सातत्याने विविध विकासकामांबाबत उदासीनता दाखवण्यात येत आहे. कामांमध्ये गतिमानता आणण्यासाठी उपसरपंच संदीप सातव यांच्या नेतृत्वाखाली नगररोड वाहतूक कृती समितीच्या वतीने गुरुवारी तोंडाला काळ्या फिती लावून पीएमआरडीएच्या औंध येथील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संबधित अधिकार्‍यांनी 15 सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्षात कामास सुरुवात करणार असल्याचे असल्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर मोर्चाला स्थगिती देण्यात आली.

सुविधा पुरविण्यात चालढकलपणा

विविध सुविधांसाठी उपोषण देखील करण्यात आले. परंतु संबधित कार्यालयाकडून होत असलेल्या चालढकलपणामुळे अखेर संदीप सातव यांच्या नेतृत्वाखाली नगर रोड वाहतूक कृती समितीच्या वतीने पीएमआरडीए कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी वाघेश्‍वर मंदिर, चौक ते केसनंद फाटा चौक असा 1300 मीटर लांबीमधील संगम स्थानांची सुधारणा करणे, सहा पदरी रस्ता रुंदीकरण, फूटपाथ, दुभाजक, रेलिंग आदी कामांची सुरवात 15 सप्टेंबरला होणार असल्याचे लेखी पत्र आयुक्त किरण गित्ते यांनी कृती समितीला दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सुविधांकडे पीएमआरडीएचे दुर्लक्ष

नगर महामार्गावर वाघोली येथे गेली अनेक वर्षापासून वाहतूक कोंडीने वाहनधारकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच रस्ते, कचरा, पाणीपुरवठा आदी मुलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पीएमआरडीएची स्थापना झाल्यापासून गावाचा निधी पीएमआरडीएकडे जमा झाला. मात्र गावाच्या मुलभूत सुविधांकडे पीएमआरडीएकडून सातत्याने दुर्लक्ष केले गेल्यामुळे स्थानिकांसह वाहनधारकांना विविध समस्यांना गेली अनेक वर्षापासून सामना करावा लागत आहे.

…तर रास्ता रोको

पीएमआरडीएकडून 15 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. दिलेल्या आश्‍वासनुसार काम सुरू झाले नाहीतर नगर रोड वाहतूक कृती समितीच्या वतीने रस्ता रोको करण्यात येईल. आंदोलनाला वेगळे वळण लागल्यास संबंधित विभाग जबाबदार राहील.
संदीप सातव, उपसरपंच, वाघोली