वाघोलीसाठी तीन हजार मीटर उपलब्ध

0

वीजबिल केंद्राची मात्र प्रतीक्षाच

वाघोली : वाघोली येथील ग्राहकांना सिंगल फेज मीटर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने दि.20 ऑगस्टला महावितरणचे मुख्य अभियंता यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार सिंगल फेज व थ्री फेजचे तीन हजार मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वाघोली विद्युत महावितरण शाखा अंतर्गत साधारणतः पंचेचाळीस हजार ग्राहक संख्या असून मोठ्याप्रमाणात नवीन ग्राहकांची मागणी वाढली आहे. मात्र चार-पाच महिन्यापासून सिंगल फेज मीटर उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकांना सिंगल फेज मीटर उपलब्ध करून द्यावे व वीज भरणा केंद्र सुरु करावे अशी मागणी श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कल्पेश जाचक, शिवदास पवार, सुधीर दळवी यांनी केली होती. दरम्यान सिंगल फेजचे तीस हजार मीटरची ऑर्डर काढली असून येत्या आठ दिवसात दहा हजार मीटर उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी सांगितले होते.

तसेच मुळशी विभागचे कार्यकारी अभियंता मुळशी रवींद्र बुंदिले यांनी वाघोली येथे महावितरण कार्यालयात स्वतंत्र वीज बील भरणा केंद्र सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले होते. या दोन ओशासन पैकी एका आश्वासननाची पूर्तता काही प्रमाणात का होईना पूर्ण केली. मात्र वीज बिल भरणा केंद्र अद्यापही सुरु करण्यात आले नाही. श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून ग्राहकांना आता मीटर उपलब्ध होणार असल्यामुळे त्यांची हेळसांड थांबणार आहे.