वाचन हेच शिक्षकाचे खरे भांडवल : डॉ. गणपतराव मोरे

0

पुरंदर । बदलणार्‍या काळानुसार शिक्षकाने आपले ज्ञान अद्ययावत केले पाहिजे. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात तर शिक्षण क्षेत्रात अनेक बदल वेगाने होत आहेत. या बदलाबाबत आपल्याला माहिती असायला हवी. तसेच आपले अध्यापन प्रभावी व परिणामकारक होण्यासाठी वाचन महत्त्वाचे असून तेच शिक्षकांचे खरे भांडवल आहे, असे मार्गदर्शन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे यांनी केले.सासवडच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माहूर माध्यमिक विद्यालयात शनिवारी (दि. 2) शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विषय कृतीसत्र एकदिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी महादेव जाधव, दत्तात्रय गवळी, कानिफनाथ अमराळे, बाबूसाहेब माहूरकर, प्रा. यू. एन. निगडे, शैलजा कोंडे, सुनंदा अधिकारी उपस्थित होते.

सागर यांचा सत्कार
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा. नंदकुमार सागर यांचा माहूर विद्यालय व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वाईचे राजेंद्र चव्हाण यांनी शिक्षकांनी आनंदी कसे राहावे?, सुधाकर जगदाळे यांनी शासन निर्णय व मराठी शाळा कशा टिकवता येतील? आणि संजय धुमाळ व रामभाऊ भोसले यांनी लेखनिकांची ऑनलाईन कामे, पी. एफ., पेन्शन याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय गवळी यांनी केले. सूत्रसंचालन महेंद्र भोसले यांनी तर रामप्रभू पेटकर यांनी आभार मानले.