वाजपेयींच्या काळातही सर्जिकल स्ट्राईक!

0

नवी दिल्ली । केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना 2002 मध्ये भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केले होते. मात्र, ती संपूर्ण कारवाई गुप्त ठेवण्यात आली होती. त्यामुळेच ती कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांना आणि जवानांना सरकारकडून कोणतेही पदक देण्यात आले नाही, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. तत्कालीन फ्लाईट लेफ्टनंट राजीव मिश्रा यांनी त्या सर्जिकल स्ट्राइकचे नेतृत्व केले होते. त्यावेळी मिश्रा 29 वर्षांचे होते. ज्यावेळी मिश्रा यांना कारवाईची तयारी करण्यासाठी बोलावण्यात आले होते, त्यावेळी त्यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यांच्यासोबत कारवाईत आणखी दोघांचा सहभाग होता.

पाकिस्तानात घुसून हल्ल्याची होती योजना
2002 मध्ये पंतप्रधानपदी अटलबिहारी वाजपेयी होते, तर जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी होती. 2002 च्या जून महिन्यात ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दोन्ही देशांना समजवण्याचे प्रयत्न केले होते, असे या वृत्तात म्हटले आहे. लष्कराचे जवान पाकिस्तानात घुसून हल्ला करतील, अशी पहिली योजना होती. मात्र त्यानंतर तत्कालीन लष्करप्रमुख एस. पद्मनाभन यांनी ही योजना रद्द केली. त्यानंतर पाकिस्तानवर हवाई मार्गाने कारवाई करण्याची योजना निश्चित करण्यात आली. या कारवाईची वाच्यता कुठेही केली जाणार नाही, असे त्यावेळी ठरवण्यात आले होते. पश्चिमेकडील सीमेवरील सर्व हवाई तळांना पाकिस्तानच्या प्रत्युत्तरासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या कारवाईसाठी जवानांच्या पथकाने 1 ऑगस्टला श्रीनगरसाठी कूच केले होते, असे यात म्हटले आहे.

असा झाला होता हल्ला..
सर्वात आधी हेलिकॉप्टरच्या मदतीने दोन जवानांना श्रीनगरमधील सीमेवर पाठवण्यात आले. त्यानंतर हे जवान सीमा पार करून पाकिस्तानात गेले. पाकिस्तानी बंकर्सचा ठावठिकाणा हवाई दलापर्यंत पोहोचवण्याचे काम या जवानांकडे होते. लेझर गाईडन्स सिस्टिमच्या आधारे जवानांनी हवाई दलापर्यंत पाक बंकर्सची माहिती पोहोचवली. त्यानंतर फ्लाईट लेफ्टनंट राजीव मिश्रा आणि त्यांच्या चमूने कुपवाडा क्षेत्रातील पाक बंकर उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात पाकिस्तानचे नेमके किती नुकसान झाले, याबद्दलची माहिती या वृत्तात देण्यात आलेली नाही. तत्कालीन फ्लाईट लेफ्टनंट राजीव मिश्रा यांनी याविषयी भाष्य करण्यास नकार दिला.