वाटेल ती किंमत मोजून सरकार पडण्याचा विरोधकांचा प्रयत्न: संजय राऊत

0

मुंबई: कर्नाटक, मध्य प्रदेशनंतर आता महाराष्ट्रात भाजपकडून सरकार पडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची राजकारणात चर्चा आहे. मात्र भाजप नेते या चर्चेला दुजरा देत नाहीत. दरम्यान शिवसेना नेते महाविकास आघाडी सरकार बनविण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे खासदार संजय राऊत यांनी येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु असल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधील ‘रोखठोक’ या सदरात संजय राऊत यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे.

सध्या विधानपरिषदेवरील १२ राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीवरून राज्यात पेच निर्माण झाला आहे. यापूर्वीच्या सदस्यांची मुदत १५ जूनलाच संपली आहे. त्यावरून संजय राऊत यांनी राज्यपाल आणि भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

१२ सदस्यांची नियुक्ती ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबवली जाईल. ऑक्टोबरचाच महिना कशासाठी? यावर बाहेर अशा पैजा लागल्या आहेत की, महाराष्ट्राचे सध्याचे सरकार वाटेल ती किंमत मोजून ऑक्टोबरपर्यंत खाली खेचू. नंतर येणारे सरकार नामनियुक्त १२ जणांच्या नेमणुका करेल, पण हे केवळ स्वप्नरंजन आहे. सरकारला कोणताही धोका नाही. या राजकारणात राज्यपाल नावाची घटनात्मक संस्था नाहक बदनाम केली जात आहे. राज्यपालांच्या नावे परस्पर कोणी हे राजकारण करत असेल तर राज्यपालांनीच ते रोखायला हवे,’ असे राऊत यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीवेळीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरुन असाच वाद निर्माण झाला होता. त्यावेळीही संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली होती. राजभवन हा फालतू राजकारणाचा अड्डा झाल्याची टीका त्यांनी केली होती.