वाट पहाणार्‍या तरुणाचा मोबाईल हिसकावला

0
चाकण : बसची वाट पाहत उभा असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन दुचाकीस्वारांनी हिसकावला. मोबाईल हिसकावल्यानंतर दुचाकीस्वार वेगात निघून गेले. ही घटना चाकण येथे पुणे-नाशिक रस्त्यावर स्वयंवर मंगल कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 11) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. विकास प्रकाश पाटील (वय 23, रा. चाकण) या तरुणाने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विनायक लक्ष्मण थिगळे (रा. वरची भांबुरवाडी, खेड, जि. पुणे) आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास मूळ धुळे जिल्ह्यातील सिंदखेडामधील आहे. तो शिक्षणासाठी पुण्याला आला आहे. मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास चाकणमधील स्वयंवर मंगल कार्यालयासमोर तो बसची वाट पाहत उभा होता. त्यावेळी पल्सर मोटारसायकल (एमएच14/ईआर7084) वरून तीनजण आले. भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वारांनी विकासच्या हातातील मोबाईल फोन हिसकावला. ही घटना त्याने त्याच्या नातेवाईकाला सांगितली. दोघे मिळून चाकण पोलीस ठाण्यात आले असता, मोबाईल फोन हिसकावणार्‍यांमधील एकाला नागरिकांनी पकडून पोलीस ठाण्यात आणले होते. विकासने चोराला ओळखले असून त्याचे अन्य दोन साथीदार पळून गेले आहेत. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.