शिक्रापूर । शिरूर येथील वाडागाव जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नुकत्याच झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी नुकतीच शाळेला भेट दिली. तसेच या शाळेला कसलीही कमतरता भासू देणार नसल्याचे सांगितले.
वाडागाव जिल्हा परिषद शाळा दीपावलीच्या सुट्टीमुळे बंद होती. त्यामुळे चोरट्यांनी शाळेच्या खोलीचे कुलूप तोडून सहा संगणक संच, एक झेरॉक्स मशीन, एक एलईडी टीव्ही अशा वस्तू चोरून नेल्या. त्यामुळे मांढरे यांनी शाळेची पाहणी केली. शाळेची पाहणी केल्यानंतर शाळेसाठी सरंक्षक भिंत बांधण्यासाठी तसेच शाळेच्या वर्गखोल्या दुरूस्त करण्यासाठी तातडीने निधी मंजूर करण्यात येईल. चोरी गेलेल्या वस्तूंमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून संबंधित वस्तू व साहित्य शाळेला देणार असल्याचे मांढरे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी उपसरपंच विकास कोळेकर, केंद्रप्रमुख नानासाहेब वाजे तसेच बाळासाहेब वाडेकर आदी उपस्थित होते.