वाडा : वाडा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्याने या दोन्ही पदांसाठी निवडणूक आज घेण्यात आली. या निवडणुकीत सभापती पदी भाजपच्या अश्विनी शेळके यांची तर उपसभापती पदी जगन्नाथ पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीचे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने जल्लोषात स्वागत केले.
वाडा पंचायत समितीची सदस्य संख्या 12 होती. मात्र वाडा नगर पंचायत घोषित झाल्याने वाडा गणाचे सदस्य रद्द झाले. त्यामुळे एकूण 11 सदस्य आहेत. त्यापैकी सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. भाजपाने शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी समजोता केला आहे. प्रत्येक सदस्याला संधी मिळावी असे ठरल्याप्रमाणे भाजपाचे अरूण गौंड , राष्ट्रवादी काँग्रेसच्या मृणाली नडगे यांनी सभापती पदाचा अनुक्रमे दीड व एक वर्षाचा तर नंदकुमार पाटील , माधुरी पाटील यांनी उपसभापती पद यापूर्वी भुषविले आहे.
शुक्रवारी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. यात भाजप कडून सभापती पदी पदासाठी अश्विनी शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या शामा गायकर यांनी निवडणूक लढवली. अश्विनी शेळके यांना सहा तर शामा गायकर यांना पाच मते मिळाली. उपसभापती पदासाठी भाजपचे जगन्नाथ पाटील व शिवसेनेचे अरूण अधिकारी यांच्यात लढत झाली. जगन्नाथ पाटील यांना सहा तर अरूण अधिकारी यांना पाच मते मिळाली यात पाटील विजयी झाले.
सभेचे अध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी म्हणून विश्वनाथ वेतकोली यांनी काम पाहिले नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा , प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोले , ज्येष्ठ नेते मधुकर पाटील, माजी उपसभापती नंदकुमार पाटील, कृषी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भोईर, भाजपचे वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार, माजी सभापती अरूण गौंड , युवा कार्यकर्ते मंगेश पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.