पुणे । शुक्रवार पेठेतील वाडिया हॉस्पिटलच्या नवीन इमारतीच्या टेरेला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. यामध्ये तेथील गोडाऊनमधील लाकडी फर्निचर जळून खाक झाले़ सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या इमारतीचे काम सुरू असल्याने अनर्थ टळला.
हॉस्पिटलच्या आवारात नवी दुमजली इमारत बांधण्यात आली आहे़ या इमारतीचे काम सुरू होते़ त्यासाठी लागणारे प्लायवुड, खुर्च्या, वॉलपेपर अशा विविध वस्तू टेरेसवर पत्र्याचे गोडाऊन बनवून त्यात ठेवल्या होत्या़ सोमवारी दुपारी या गोडावूनला आग लागली़ गोडावूनमध्ये लाकडी साहित्य असल्याने त्यांनी पटकन पेट घेतला आणि काही मिनिटातच संपूर्ण गोडावून पेटले़ या आगीच्या ज्वाळा इतक्या उंच जात होत्या की शेजारील झाडाच्या फांद्यांनीही पेट घेतला होता़ घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे 2 बंब व 3 टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी त्वरित ही आग आटोक्यात आणली. या आगीत गोडावूनमध्ये ठेवलेला सर्व माल जळून खाक झाला़ त्या इमारतीत कोणीही नसल्याने आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकली नाही.