वाडी । शिरपूर तालुक्यातील वाडी बु. गावातील ग्रामस्थांची शासकीय कामासाठी लागणार्या कागदपत्रांसाठी तलाठी, ग्रामसेवक यांच्या सेवेअभावी वणवण होत असल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. चार हजार लोकसंख्येचे असलेले वाडी गावाचा शासकीय अधिकारी, कर्मचार्यांच्या अकार्यक्षम मानसिकतेमुळे आणि दांड्या मारू वृत्तीमुळे विकास खुंटत असल्याचे चित्र आहे. गावात ग्रामपंचायत आहे मात्र ग्रामसेवक महिना-महिना गावात फिरकत नसल्याची तक्रार नागरिकांमधून होत आहे. वाडी ग्रामपंचायत येथे गेल्या दोन वर्षांपासून ग्रामसेवक डी. एस. अहिरे हे कार्यरत आहेत. मात्र ग्रामसेवक गावात न राहता नवापूर हुन ये जा करतात ते देखील महिन्यातून दोन तीन वेळाच त्यामुळे नागरिकांचे शासकीय कामासाठी लागणार्या कागदपत्रांसाठी होत आहेत. त्याचप्रमाणे गावात गेल्या दोन वर्षांपासून कोणतेही गाव विकासाच्या योजना राबविल्या गेल्या नसल्याची ओरड गावकर्यांमधून होत आहे.
ग्रामस्थांशी उद्धटपणे वागणे
कागदपत्रांसाठी किंवा काही तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकांना ग्रामसेवकांकडून सहकार्य तर होतच नाही वरून उद्धटपणाची वागणूक मिळत असल्याने नागरिक ग्रामसेवक,तलाठी यांच्या अशा वागण्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीत काय शिजवल जाते याबाबत लोकांमध्ये तर्क वितर्क लढवले जात आहेत. कोणत्याही ग्रामसभेची माहिती लोकांना दिली जात नाही. तर ग्रामसभेला ग्रामसेवक,तलाठी हे उपस्थित राहतात कि नाही असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. शासनाने नागरिकांना शासकीय कामासाठी लागणारे कागदपत्र वेळेवर मिळावे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत संग्राम केंद्राची निर्मिती केली आहे. मात्र वाडी ग्रामपंचायतीत संगणक आहे मात्र इंटरनेट कनेक्शनच नाही म्हणून संग्राम केंद्र नावापूरतेच राहिले आहे.
मी नवापूरला राहतो म्हणून मला वाडी गावासाठी आठवड्यातून फक्त तीन वार दिले आहेत. मी त्या त्या दिवशी येतो. माझ्या घरी लग्न आहे. म्हणून मी पंधरा दिवस सुट्टीवर आहे. म्हणून ग्रामपंचायतीचा कारभार कोणी बघावा ते गट विकास अधिकारी यांना विचारावे.
डी. सी. अहिरे, ग्रामसेवक
माझ्या आईला मधुमेहचा विकार असल्यामुळे मला त्यांची काळजी घेण्यासाठी घरीच थांबावे लागते. मी वाडी गावात येत राहतो. सध्या ऑनलाइन सात बाराचे काम सुरु असल्यामुळे तालुक्याला जास्त काम असते म्हणून मी येत नाही. लोकांचे काही काम असले तर कोतवाल घेऊन येतो. मी सह्या करून देतो. एस जे काकळे, तलाठी
ग्रामपंचायतीचे दप्तर ग्रामसेवकाच्या घरी!
येथील ग्रामपंचायतीचे सर्व लेखा जोखाचे दप्तर ग्रामसेवकानी आपल्या घरी नवापूर ला नेले आहे. नागरिकांनी कार्यलयत येऊन दप्तर पाहण्याचे विचारणा केली तर दप्तराचे ऑडिट काम सुरु असल्याचे ते सांगतात. शासकीय कामाचे दप्तर कार्यालय असून कार्यालयात न ठेवता ग्रामसेवक घरी घेऊन जाऊन ग्रामसभेत झालेल्या ठरावात फेरफार करत तर नाहीत ना असा प्रश नागरिक उपस्थित करत आहेत. शासनाने लाखो रुपये खर्च करून तलाठी सज्जाची इमारत उभारली परंतु या पडक्या शासकीय तलाठी कार्यालयात गावातील काही लोकांच्या आशीर्वादाने शेत राखण कटणारे परप्रांतीय लोक वास्तव्य करून राहतात. या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्याबरोबर गावाचा विकासकामेदेखील रखडली आहेत.