वाडी ग्रामपंचायत रामभरोसे

0

वाडी । ग्राम विकास अधिकार्‍याच्या सतत गैरहजर राहण्यामुळे वाडी ग्रामपंचायतीचा कारभार राम भरोसे सुरू आहे. दरम्यान याबाबत ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे तक्रार करूनही ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगण्यात येते तर गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणार्‍या दाखल्यांसाठी वारंवार चकरा माराव्या लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शिरपूर तालुक्यातील वाडी बु ग्रामपंचायतिचा कारभार तत्कालीन ग्रामसेवक सोनवणे यांच्या बदली नन्तर नव्याने रुजू झालेले ग्रामविकास अधिकारी डी.सी. अहिरे यांच्या सतत गैरहजेरीमुळे गावाचा सर्वांगीण विकास खुंटला असल्याचे बोलले जात आहे. अहिरे हे नौकरीच्या गावी म्हणजे वाडी बु॥ येथे मुख्यालयी न राहता आपल्या गावी म्हणजे नवापूर हुन आठवड्यातुन एखादी फेरी मारत असतात. त्यामुळे गावातील वसुली तर होतच नाही परंतु शासनाच्या विविध योजनां राबवून गावाचा विकासदेखील केला जात नसल्याच्या तक्रारी गावकर्‍यांकडून होत आहेत.

गावात सर्वत्र अस्वच्छता
ग्रामसेवक अहिरे यांच्या बेजबाबदार कर्तव्यामुळे ग्रामविकासकडे साफ दुर्लक्ष केले असून गावात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढले आहे. गावातील तुडुंब भरलेल्या गटारी वेळेवर काढल्या जात नाही त्यामुळे गटारींचे सांडपाणी रस्त्यावर येऊन दुर्घन्धी पसरत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल अशी शंका उपस्थित केली जात आहे. ग्रामपंचायतीच्या इमारतीची दुरवस्था झाली असून ग्रामपंचायतीच्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे.

शासकीय कर्मचार्‍यांवर लोकप्रतिनिधींची कृपा
गावातील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु वैदयकीय दवाखाना, प्राथमिक शाळा आदी ठिकाणच्या कर्मचार्‍यांवर गावातील लोकप्रतिनिधींचे नियंत्रण नसून आपले स्वहित जपण्यासाठी कृपादृष्टी राखली जात असल्याने कर्मचारी बेजबाबदारपणे वागत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान गावातील नागरिकांनी असुविधे बाबत आवाज उठवला तर त्याची कुठेही दखल घेतली जात नाही. त्यामुळे गावात असुविधे सोबतच गावाचा विकास देखील मंदावला आहे.

शालेय विद्यार्थी दाखल्यांसाठी त्रस्त
गावातील प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक कामांसाठी रहिवासी दाखल्याची आवश्यकता भासत आहे. गेल्या 15 दिवसापासून विद्यार्थी बंद ग्रामपंचायत कार्यालयाभवती चकरा मारत आहेत. ग्राम विकास अधिकारी अहिरे हे फोन करून देखील गावात येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दलित वस्तीत निकृष्ट रस्त्याचे काम
सन 2016-17 या आर्थिक वर्षात सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दलित वस्ती सुधारणा अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी 5 लाखाचे अनुदान प्राप्त झाले होते. दरम्यान रस्त्याच्या कामात आर्थिक हित साधत ग्रामपंचायत प्रशासनाने सदर काम ठेकेदारी पद्धतीने दिल्यामुळे काम निकृष्ठ झाल्याची ओरड होत आहे. यावर ग्रामविकास अधिकार्‍यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.