वाड्यातील मुख्य रस्ता झाला खड्डेमय

0

वाडा : शहरातील मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे मोठ्या जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांची तातडीने दूरूस्ती करावी, अशी मागणी मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. त्याची दखल न घेतल्याने प्रवाशांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. खंडेश्वरी नाका, बसस्थानक, मशीद नाका, व परली नाक्यावर पडलेल्या खड्ड्यांमूले अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे. या खड्ड्यांमुळे आदळून अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत.

रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास आंदोलन
या खड्ड्यात गेलेल्या रस्त्यावरून चालताना अनेकदा विद्यार्थ्यांच्या अंगावर चिखल उडल्याने शाळेला दांडी मारून घरचा रस्ता धरायला लागतो. शिवाय चिमुकल्या विद्यार्थ्यांना रस्त्यावरून वाट काढताना अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. असे असताना या रस्त्याची तात्काल दुरूस्ती करणे गरजेचे आहे. मात्र प्रशासन याबाबत हलगर्जीपणा दाखवत असून तक्रारीना केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गोविंद पाटील यांनी केला आहे. या रस्त्याची दुरूस्ती तात्काल केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.