वाड्यात मोकाट जनावरांचा हौदोस

0

वाडा : वाडा शहरात भटकी कुत्री आणि मोकाट गुरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून एका भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी झालेल्या एका 8 वर्षीय विद्यार्थ्याचा दोन दिवसापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रणित पाटील (8) असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून तो वाड्यातील शिवाजीनगरमध्ये राहत होता. हा विद्यार्थी लिटील एंजेल या शाळेत चौथीमध्ये शिकत होता. प्रणित हा शाळेतून येत असतांना आठ दिवसापूर्वी भटका कुत्रा चावला होता. त्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले मात्र रेबीज होऊन उपचारादरम्यान त्याचा नुकताच दुर्दैवी मृत्यू झाला.

पालकांमध्ये भीतीचे वातावरण
वाडा शहरातील नागरिकांमधे व विशेषत; पालकवर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर या मोकाट गुरांमुळे व भटक्या कुत्र्यामुळे अनेक लहान-मोठे असे अनेक अपघात घडले असून यात अनेक जण जखमी झाले तर अनेकांच्या गाड्यांचेही नुकसान झाले आहे. ही घटना अत्यंत भयावह असून त्याची गंभीर दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा आणि भटक्या गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे वाडा तालुका पालक संघाने वाडा नगर पंचायतीचे प्रशासक तथा वाड्याचे तहसिलदार दिनेश कुराडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
वाडा शहरातील भटक्या कुत्र्यामुळे एका लहान मुलाला आपला जीव गमावावा लागला आहे. ह्या घटनेमुळे पालकवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात मागील वर्षी एक जनहित याचिक वाडा न्यायालयात दाखल करण्यात आली होती व न्यायाल्याने या संदर्भात वाडा ग्रामपंचायतीला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते मात्र ग्रामपंचायतीने त्यावेळी कोणतीही कारवाई केलेली नसल्याने हा प्रसंग ओढवला असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

शाळेत मुलांना सोडण्यासाठी सुद्धा आम्ही घाबरत आहोत. जागोजागी ही भटकी कुत्री आणि गुरे उभी असतात आणि ती कधीही लहान मुलांवर किंवा नागरिकांवर हल्ला करतात. त्यामुळे लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करावा.
– जयेश शेलार (अध्यक्ष-वाडा तालुका पालक संघ)