भुसावळ। दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात चोर्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याठिकाणी केंद्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा असतानाही भुरट्या चोर्या थांबत नाहीत, यामध्ये केंद्रातील तांब्याच्या विद्युतवाहक तारा तसेच राख वाहून नेणारी पाईपलाईन चोरी केल्याच्या घटना वारंवार घडत असतात यामुळे महाजनकोचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून येथील सुरक्षेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यामुळे याबाबींकडे वरिष्ठांनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.
सुरक्षा भिंतीला भगदाड पडल्याने चोरट्यांची सुविधा
दीपनगर प्रकल्पाच्या यार्डातील विविध खासगी कंपन्यांच्या गोडावूनमध्ये अनेक भुरट्या चोर्यांचे प्रकार घडले आहेत. खासगी कंपन्यांकडून याबाबत गुन्हे दाखल होत नाहीत. दीपनगरात महानिर्मितीची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा आहे. मात्र या यंत्रणेला भेदून चोर्या होतात. गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी दीपनगर औष्णिक केंद्रातील कर्मचारी वसाहतीमध्येही चोर्यांचे प्रकार घडले होते. यामध्ये ताब्यांच्या विद्युत वाहक तारा चोरीस जाण्याच्या घटना तर वारंवार घडत असतात, काही दिवसांपूर्वी महानिर्मितीची वेल्हाळे परिसरातील अॅश वाहिनीचे पाईप चोरी झाली होती. सहा मिटर लांबीच्या एका पाईपाचे वजन किमान पाच ते सात क्विंटल असते. चोरट्यांनी असे 13 पाईप अर्थात तब्बल 78 रिनिंग मिटर पाईपलाइन लांबवली. या पाईपलाइनवर महानिर्मिती आणि खासगी सुरक्षा रक्षक तैनात असतानाही चोरी झालीच कशी? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. दीपनगर केंद्र ते वेल्हाळे बंडापर्यंत तब्बल 14 किमी अंतराची पाईपलाइन चोरट्यांमुळे धोक्यात आली आहे. अवजड पाईपलाइन चोरी प्रकरणात मोठ्या वाहनाचा वापर करण्यात आला असावा. पाईपलाइनच्या शेजारुन वाहनाचा वापर होत असतानाही सुरक्षा यंत्रणेच्या निदर्शनास ही बाब येवू नये, हा प्रकार गंभीर आणि संशयास्पदही आहे. दीपनगरच्या 500 बाय दोन विस्तारित प्रकल्पातील पिंप्रीसेकम रस्त्याच्या संरक्षण भिंतीला अनेक वर्षांपासून भगदाड पडले आहे. याबाबत तक्रारी वाढल्यानंतर ते तातडीने बुजवले जाते. मात्र दोन-चार आठवड्यांमध्येच भुरटे चोर पुन्हा त्याच ठिकाणी भगदाड निर्माण करतात. भोगावती नदीपात्रातूनही प्रकल्पाच्या मागील बाजूसही रात्री चोरट्यांचा उच्छाद असतो.