वाढत्या तापमानाने शेतातील पिके करपली

0

भुसावळ । सध्या तापमानाचा पारा वाढलेला असला तरी शेतकरी आपल्या शेतात खरिपाच्या पूर्वतयारीची लगबग करीत असून त्यांच्यासमोर आता शेतातील धानपिक व भाजीपाला धार्जिनीचे पीक वाचविण्याचा मोठा पेच निर्माण झाला आहे. उन्हाची प्रखरता व विजेचे भारनियमन या दोन्हीच्या कचाट्यात शेतकर्‍यांची शेती व भाजीपाला अडकला असून त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

भाजीपाला वाचविण्यासाठी कसरत
उन्हाळ्यात विहीरी, बोअरवेल्स, फिल्टरपंप आटल्याने पिकांनी मान खाली टाकली आहे. शेतकरी यामुळे अडचणीत सापडला आहे. भाजीपाल्यात अतिउष्णतेने अळी, बुरशीने जोर धरला असून उत्पादन धोक्यात आले आहे. शेतात विहिर आहे. पण त्यात पाणी नाही. तर ज्यांच्याकडे पाणी आहे. त्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही. असा दुहेरी मारा त्यातल्या त्यात भारनियमन व उष्णतेचा परिणाम यामुळे शेतकर्‍यांना पिकांबाबत विचार करुनच घामाघुम होतानाची परिस्थिती सध्याची आहे. अगदी सकाळपासूनच उष्णतेचा कळस गाठत आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांपासून कसेबसे आर्थिक उत्पन्न घेता येईल. असा विचार करुन शेतात भाजीपाला पिकांची लागवड करणार्‍या शेतर्‍यांचे गणित पुरते कोलमडले आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च काढावा तरी कसा असा प्रश्‍न शेतकर्‍यासमोर उभा ठाकला आहे. जलस्त्रोत पुरते कोरडे पडल्यामुळे शेतकर्‍यांना भाजीपाला वाचविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत कसाबसा वाचविलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारात नेल्यावर कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. निसर्गचक्रात अडकलेल्या शेतकर्‍यांच्या पिकांना वाचविण्यासाठी प्रशासनाने मदत करण्याची गरज आहे. मे हिटचा तडाका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस सुर्य अधिकच तापत असल्याने भविष्याची चिंता वाढली आहे. पाण्याची पातळी अगदी खोल गेली असून पिकांनीसुध्दा मान टाकली आहे. विजेच्या कमी दाबाच्या पुरवठ्याने विहिरीवरील पंप देखील पाणी सोडत नसल्यामुळे पिके संकटात सापडली आहेत.