भुसावळ। मागील काही दिवसांपासून भुसावळकरांवर सूर्य कोपल्याचे दिसून येत आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी 42 अंश सेल्सीअस तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान, गुरुवारी 43 अंश सेल्सीअस तापमान होते. सुर्याची ही आग असह्य होत असल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. भुसावळचा उन्हाळा हा अतिशय तापदायी असतो. त्यामुळे उन्हाळ्यात बाहेरील नागरिक भुसावळात येण्यास मागे पुढे विचार करतात.
अगोदरच वर्तविण्यात आले होते भाकित
यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे जलसाठ्यात बर्यापैकी पाणी जमा झाले. याशिवाय पाण्याच्या पातळीतही वाढ झाली होती. पावसाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही थंडी चांगलीच पडली. काही दिवस तर थंडीने शहरवासीयांना गारठवून टाकले होते. दोन्ही ऋतूने आपले गुणधर्म व्यवस्थित दाखविल्याने यंदाचा उन्हाळाही चांगलाच तापणार असल्याचे भाकित वर्तविण्यात आले होते.
शहरात होतेय सर्वाधिक तापमानाची नोंद
एप्रिलच्या पंधरवाड्यातच शहराचे तापमान 44 अंशावर गेले होते. एक दोन दिवसांचा अपवाद वगळता तापामानाने उच्चांकच गाठला होता. याच महिन्यात अखेरच्या आठवड्यात पारा 45 अंश पार गेला. शहरवासियांना मे महिन्यात मे हिटचा अनुभव दरवर्षी येतो. या दरम्यान शहरातील गल्लीबोळात अघोषित संचारबंदी लागू असल्याचा भास निर्माण होतो. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यात शहरवासियांना मे हिटचा सामना करावा लागला. आत मे महिन्यात तर सूर्य आग ओकत आहे. एक- दोन दिवसांचा अपवाद वगळला तरर दररोज शहराचे तापमान सर्वाधिक असल्याची नोंद होत आहे.
वृक्ष लागवड करावी
शहरालगत दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. यामुळेही तापमानात वाढ होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात वाढतले प्रदुषण यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. विशेष म्हणजे ऐवढे मोठे तापमान असताना देखील वृक्षलागवड त्या प्रमाणात होत नाही. केवळ कागदोपत्री वृक्षलागवड दाखविण्यात येत असली तरी प्रत्यक्षात दिसत नाही. यामुळेही तापमान वाढत आहे. तापमानाने उच्चांक गाठला आहे. सकाळी 10 वाजेनंतरच उन असह्य होत आहे. त्यामुळे नागरिक दुपारी 1 वाजेनंतर बाहेर पडताना दिसून येत नाही. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिक बाहेर पडत नाही. त्यामुळे दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडल्याचे दिसून येत आहे.